सोलापूर : महापालिकेने सुरू केलेल्या दुपारच्या सत्रातील कचरा संकलनामुळे ३० टन कचरा जास्त प्रमाणात उचलला जात आहे. दुपारच्या सत्रात भैय्या चौक, आसार मैदान, पार्क चौपाटी, नवी पेठ, पूर्व भाग, ७० फुटी रोड, सात रस्ता परिसरातील खाऊ गल्ली, एसटी बसस्थानकासह इतर भागात २७ ते ३० गाड्या धावू लागल्या आहेत. कचरामुक्त शहरासाठी महापालिकेचा घनकचरा विभाग सतर्क झाला आहे.
दरम्यान, महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या संकल्पनेतून दुपारच्या सत्रात कचरा उचलण्याची मोहीम १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली. मागील सात ते आठ दिवसांपासून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुपारच्या सत्रात घरोघरी जाऊनही कचरा संकलन करण्यात येत आहे. दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत कचरा संकलन करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
या संकलनामुळे शहरातील ज्या ज्या भागात कचऱ्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी, प्रदूषण कमी होणार असल्याचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले. नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता घंटागाडी अथवा कचरा संकलन कुंडात टाकावा, रस्त्यावर कचरा टाकतानाचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त घाेलप यांनी सांगितले.
वेळ पडल्यास गाड्यांची संख्या वाढणार
सध्या दुपारच्या सत्रात कचरा गोळा करण्याचे काम वेगात सुरू आहे. वेळ पडल्यास गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहेत. त्यासाठी आयुक्तांनी यापूर्वीच आदेश दिले आहेत. हद्दवाढ भागात घरोघरी उचलण्यात येणाराही कचरा दुपारच्या सत्रात वाढला आहे. ज्या भागात सकाळी गाड्या पोहचल्या नाहीत त्या भागात दुपारच्या सत्रातील गाड्या पोहोचत असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख बिराजदार यांनी सांगितले.