सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी उजनी धरणातून इंदापूरसाठी ५ टीएमसी पाणी नेण्याचा घाट घातला आहे. हा निर्णय दुष्काळी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. सांगोला तालुक्याच्या हक्काचं दोन टीएमसी पाणी अद्यापही मिळालेलं नाही. २३ वर्षांपूर्वी उजनीचे दोन टीएमसी पाणी मंजूर असूनही सांगोला उपसा सिंचन योजनेला जाणीवपूर्वक निधी दिला नाही. पाण्याच्या बाबतीत नेहमीच सांगोला तालुक्यावर अन्याय झाला आहे, असेही चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले.
उजनीचं दोन टीएमसी पाणी मिळालं, तर सांगोला तालुक्याच्या दुष्काळी भागातील हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येईल. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते उजनीच्या उचल पाण्याचे उद्घाटन होऊन २३ वर्षे झाली, तरी एक रुपयाचाही निधी दिला नाही. ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी तसेच तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिला आहे.