या टपाली मतदारासांठी गुरुवारपासून घरोघरी जाऊन टपाली मतदानाचा अर्ज वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. हे सर्व अर्ज मतदारांचे नाव, मतदान यादी क्रमांकासह छपाई करण्यात आले आहेत. मतदारांनी फक्त त्यावर सही करून आपला मोबाईल क्रमांक लिहायचा आहे. यानंतर पुन्हा घरोघरी जाऊन हे अर्ज जमा करण्यात येणार आहेत. या सर्व मतदारांसाठी मेसेजद्वारे मतदानाची तारीख कळवण्यात येणार आहे.
प्रत्यक्षात १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, या टपाली मतदारांसाठी १४ एप्रिलच्या अगोदर तीन दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला असून, त्यास मान्यता मिळाल्यानंतर मतदानाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. टपाली मतदानासाठी देखील मतदारांना मतदान केंद्रात यावेच लागणार आहे.
टपाली मतदानासाठी तीन दिवसांचा वेळ असल्यामुळे मतदारांना सोयीनुसार मतदान करता येणार आहे. या टपाली मतदानासाठी पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्यासह ११ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याचबरोबर तीन दिवस चालणाऱ्या मतदानासाठी उमेदवारांना पोलींग एजंट देखील नेमता येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा टपाली मतदान करण्याचा अर्ज मतदाराने लिहून दिल्यानंतर पुन्हा १७ एप्रिलला मतदान करता येणार नाही. त्यांना फक्त टपाली मतदानच करता येणार असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.
असे आहेत दिव्यांग अन् ज्येष्ठ मतदार
टपाली मतदान प्रक्रिया तीन दिवस चालणार आहे. घरी बसून कोणालाही टपाली मतदान करता येणार नाही. यासाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रातच मतदारांना यावे लागणार आहे. दरम्यान, ऐंशी वर्षांवरील १३ हजार ६८८ आणि १ हजार ७८२ दिव्यांग मतदार मिळून एकूण १५ हजार ४७० मतदार हे या पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती गुरव यांनी दिली.