मनुष्य देहाची इंद्रिये ही भगवंत प्राप्तीची साधने आहेत. ‘जेणे तु जोडसी नारायण’ असे संतवचन प्रसिद्ध आहे. यामध्ये ‘वाचा’ हे एक असे साधन आहे की, त्यातून निघालेल्या प्रत्येक शब्दाने आपला व्यावहारिक व आध्यात्मिक विकास होतो आहे. या वाचेलाच वाणी, बोलणं, असे पर्यायी शब्द आहेत. आपण काय बोलतो, हे महत्त्वाचे असते. कारण आपल्या बोलण्यातून एक सामाजिक वातावरण तयार होत असते. संत तुकाराम महाराज या संबंधात दोन भूमिका व्यक्त करतात. एक तर या वाणीने कसलेच बोलू नये किंवा वाचातीत अशी अवस्था ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने प्रगट करतात. ते म्हणतात-
न बोलसी करा वाचा।उपाधीचा संबंध।।काहीही बोलले तरी या शब्दातून उपाधी निर्माण होते व जिथे जिथे उपाधी तिथे तिथे दु:ख हे ठरलेलेच असते म्हणून अनिर्वचनीय भूमिकेचे समर्थन तुकाराम महाराज करीत असतात. ते म्हणतात की, जर बोलायचेच असेल तर फक्त देवाविषयी बोलावं बाकी काही नको.
बोलणेचि नाही। आता देवाविण काही।।आता या वाचेने प्रपंचातील काही बोलणे नाही, जे बोलायचे ते फक्त देवाविषयी, अशी ही वाचा भगवद्स्वरूप झालेली आहे. या वाचेला भगवंत नामाचा छंद लागलेला आहे.
माझी मज झाली अनावर वाचा।छंद या नामाचा घेतलासे।।देवर्षी नारदमुनींनी हीच भूमिका भक्तिसूत्रामध्ये सांगितली आहे.अव्यावृत भजनात। ही अवस्था येण्यासाठी प्रथमत: वाचेच्या ठिकाणी या प्रापंचिक आसक्तीने निर्माण झालेले दोष जावे लागतील. कारण प्रपंचामध्ये असताना ही वाचा नको नको ते शब्द बोलून अत्यंत मलिन झालेली आहे. या वाचेतून निघणाºया शब्दाने अनेक कलह समाजामध्ये निार्मण झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी माणसाने ‘कसे बोलू नये’ याचे वर्णन केले आहे. ज्ञानेश्वरीतील १३ व्या अध्यायात
विरोधू वादुबळु। प्राणितापढाळु।उपहासु छळु। वर्मस्पर्शुआटु वेगु विंदाणु। अशा शंका प्रतारणु।हे संन्यासिले अवगुणु। जिया वाचा।।आपल्या या वाचेने उपहासाने बोलू नये, छळाचे बोलू नये. हट्टाचे बोलू नये, कपटाचे बोलू नये, वर्मस्पर्शी बोलू नये, शंका निर्माण करणारे बोलू नये, फसवणूक करणारे बोलू नये. अशाप्रकारचे कोणतेही शब्द आपल्या तोंडातून येऊ नयेत. कारण हे बोलणे समाजामध्ये कलह निर्माण करतात; मग या वाचेने कसे बोलावे याचेही उत्तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
तैसे साच आणि मवाळ। मितले परि सरळ।।बोल जैसे कल्लोळ। अमृताचे।।माणसाने खरे बोलावे, मवाळ बोलावे, मोजके पंरतु सरळ असे बोलावे. त्याचे बोलणे म्हणजे जशा काही अमृताच्या लाटा आहेत, असे वाटावे. या बोलण्याने समाजात शांतता, समाधान निर्माण होत असते.- अॅड. जयवंत महाराज बोधले