सोलापूर : कोरोना व्हायरसमुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झाल्यापासून विद्यार्थ्यांचा उर्वरित अभ्यासक्रमांविषयीचा प्रश्न निर्माण झाला होता़ यामुळे यावर तोडगा काढत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने आॅनलाईन शिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे़ या निर्णयाची अंमलबजावणी विद्यापीठातील काही संकुलांमधून सुरू झाल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे़ संकुलांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून त्यांना नोट्स पाठविण्यात येत आहेत.
राज्य शासनाने खबरदारी म्हणून १६ ते ३१ मार्चदरम्यान शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक विषयांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती़ यामुळे विद्यापीठाने यावर तोडगा काढत विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण देण्याचे ठरविले़ विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या या निर्णयाची काही संकुलप्रमुखांनी लगेच अंमलबजावणी सुरू केली आहे़ सोमवारी विविध संकुलांतील विषयप्रमुखांनी विद्यार्थ्यांना पी़पी़टी़च्या माध्यमातून नोट्सही पाठविण्यास सुरू वात केली आहे़ प्रत्येक विद्यार्थ्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून नोट्स पाठविण्यात आले आहे़ याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन नोट्समध्ये अडचणी आल्यास त्यांनी विषयप्रमुखांना संपर्क साधावा, असेही यामध्ये सांगण्यात आले आहे.
आॅनलाईनमुळे अडचण- आॅनलाईन पद्धतीने शिक्षण हा चांगला निर्णय विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आला. पण विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाही, अनेक विद्यार्थी हे गावाकडे राहत असल्यामुळे इंटरनेटचा वापर करता येत नाही़ याचबरोबर त्यांच्याकडून मेल आयडीचाही वापर अल्प प्रमाणात केला जातो़ यामुळे या विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे़ यामुळे अशा आॅनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना नुकसान होणार आहे़
महाविद्यालये बंद असल्यामुळे संकुलातील विद्यार्थ्यांना आता आॅनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचे सांगण्यात आले आहे़ यामुळे संकुलाच्या वतीने लगेच विद्यार्थ्यांना नोट्स तयार करून ई-मेलव्दारे, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि युट्यूबमधील व्हिडीओचे लिंकही विद्यार्थ्यांना पाठविण्यात येत आहे़ याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांशी संपर्क होत नाही त्यांना त्यांच्या वर्गमित्रांशी संपर्क साधून आम्ही नोट्स पाठविण्याचा प्रयत्न करत आहोत़ - डॉ़. गौतम कांबळे, संचालक , सामाजिक शास्त्रे संकुल