सोलापूर : इंडियाच्या दोन बैठका झालेल्या आहेत. पुढच्या बैठकीस ३० ते ४० नेते असणार आहेत. मागील दोन बैठका झाल्या, यामध्ये पंतप्रधान कोण असणार याबाबत काही ठरलं नाही. सध्या सत्ता असलेल्या लोकांकडून सत्ता काढून घ्यायची आहे, एवढाच विचार असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
शरद पवार हे कार्यक्रमाच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. इंडिया आघाडीची मुंबईत ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक पार पडणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. भाजपाचा पराभव करून देशात परिवर्तन आणण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. त्यासाठी बिहारच्या पाटणा, कर्नाटकच्या बंगळुरूनंतर आता इंडिया आघाडीतील पक्षांची तिसरी महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत होणार आहे. त्यासंदर्भातील प्राथमिक बैठक नुकतीच झाल्याचेही त्यांनी सांगितले.