सोलापूर : गाडी रुकाव... गाडी रुकाव..., किसकी गाडी है... पिछे की डिक्की दिखाव... त्यावर कारचालक बाहेर येतो आणि ‘कुछ नही साहब घर का सामान ले जा रहा हूँ।’ असे सांगत आपली डिक्की उघडून दाखवली. सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेलरोड पोलीस ठाण्याच्या वतीने गुरुवारी सायंकाळी केलेल्या नाकाबंदीत हा प्रकार पाहावयास मिळाला. अडीच तासात १०० ते १५० चारचाकी वाहने थांबवून पाहणी करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीनिमित्त आचारसंहिता जाहीर झाली आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बेगमपेठ येथे बॅरिकेड्स लावून वाहनांची तपासणी झाली. चौकातून जाणाºया प्रत्येक वाहनाची पोलिसांनी अडवून चौकशी केली. डिक्की उघडा, त्यात काय आहे ते आम्हाला दाखवा, असे म्हणत प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात आली. सायंकाळी ५ वाजता नाकाबंदी करण्यात आली. ७.३० पर्यंत १०० ते १५० मोटरसायकलींची चौकशी झाली. तपासणीदरम्यान काही लोकांनी ही तपासणी कशाची आहे, अशी विचारणा केली. पोलिसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नाकाबंदी असल्याचे सांगून सहकार्य करण्याची विनंती केली. लोकांनी आपली कार दाखवून नाकाबंदीला सहकार्य केले.
सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी...- पोलीस आयुक्तालयात असलेल्या सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वत्र ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. चारचाकी वाहने, टेम्पो आदी संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहेत. नाकाबंदीदरम्यान वाहतूक शाखेचे पोलीस, पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलस कर्मचारी थांबून बॅरिकेड्सच्या साह्याने तपासणी करीत आहेत.
निवडणुकीची आचारसंहिता आहे़ पोलीस आयुक्त महादेव तांबडे, उपायुक्त मधुकर गायकवाड यांच्या आदेशावरून हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात असून, दररोज तपासणी होत आहे. -सुनील जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जेलरोड पोलीस ठाणे.