सोलापूर : भेसळयुक्त दूध पुरवठा केल्याप्रकरणी पाकणी येथील स्वामी सर्मथ दूध संस्थेला सभासदत्व का रद्द करू नये? अशी नोटीस सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने बजावली आहे. याच व्यक्तीचे एप्रिल महिन्यातही भेसळयुक्त दूध पकडले होते.
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या केगाव येथील शीतकरण केंद्रात भेसळयुक्त दूध पुरवठा करणारे रॅकेट असून यामध्ये संघाचे कर्मचारी व दूध संस्थांचे चेअरमन असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. एप्रिल महिन्यात केगाव येथील शीतकरण केंद्रात दुधाची अचानक तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी स्वीकारलेले कमी प्रतीचे दूध पकडण्यात आले होते. याप्रकरणी दूध संघाचे तीन कर्मचारी निलंबित करण्यात आले होते.
मागील महिन्यात दुधाची जशी अचानक तपासणी केली तशीच ११ मे रोजी पुन्हा तपासणी केली असता त्याच व्यक्तीचे तीन कॅन भेसळयुक्त दूध सापडले. याप्रकरणी पाकणी येथील स्वामी समर्थ दूध संस्थेला संघाने नोटीस बजावली आहे. आपल्या संस्थेचे सभासदत्व का रद्द करू नये? याचा खुलासा सात दिवसांत देण्याची मुदत दिली आहे.
---
दूध पुरवठा करणारी एकच व्यक्ती
भेसळयुक्त दूध पुरवठा करणारी व्यक्ती एकच असून
एप्रिल महिन्यात दिलीपराव माने दूध संस्थेच्या नावाने तर मे महिन्यात स्वामी समर्थ दूध संस्थेच्या नावाने दूध घातले. ११ मे रोजीचे दुधाची फॅट एक कॅन १.३, दुसरे कॅन १.९ व तिसरे कॅन २.० निघाली.
--
डाॅ. भडंगे यांच्याकडे पदभार
दूध पंढरीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे यांना सेवेतून बडतर्फ केल्यानंतर पदभार डाॅ. विजयकुमार भडंगे यांच्याकडे देण्यात आला आहे. भडंगे हे सध्या दूध संकलनाची जबाबदारी सांभाळत आहेत.
---
भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले आहे. या संस्थेवर योग्य ती कारवाई होईल. एकच व्यक्ती दोन वेळा भेसळयुक्त दूध पुरवठा करताना पकडली आहे. याप्रकरणी संघाच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाईल.
- आबासाहेब गावडे
सदस्य, प्रशासकीय मंडळ, दूध संघ