राज्य शासनाचे उपसचिव सतीश मोघे यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार २४ डिसेंबर रोजी ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे़ यात म्हटले आहे की, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३४१ क चे पोट कलम (१ ख) आणि कलम ३ चे पोटकलम (३) यांच्या तरतुदीनुसार वैराग ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्याच्या दृष्टीने वरील अधिनियमातील प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन अधिसूचना प्रसिद्ध करून त्याचा मसुदा ही जाहीर केला आहे़ या उद्षोणलेला आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीने ३० दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी आक्षेप नोंदवावा, असे म्हटले आहे़
अशी असेल नगरपंचायत हद्द
या अधिसूचनेत वैराग या महसुली गावाच्या हद्दीत असलेले सर्व क्षेत्र समाविष्ट केले आहे यामध्ये पूर्वेला लाडोळे व सासुरे गावाची शिव, पश्चिमेला मानेगाव व इर्ले गावची शिव पण इर्लेवाडी, तुळशीदासनगर गावाचा उल्लेख नाही. त्यामुळे ही दोन गावे नगरपंचायत हद्दीत की बाहेर असेल याबाबत संभ्रम आहे. दक्षिणेला सासुरे गावची शिव तर उत्तरेला घाणेगाव व मानेगाव गावाची शिव हे संक्रमणात्मक क्षेत्र असेल.
नगरपंचायत श्रेयवादात राऊतांची उडी
आ़ राजेंद्र राऊत हे बुधवारी दिवसभर मंत्रालयात तळ ठोकून होते़ वैराग नगरपंचायत करण्यासाठी त्यांनी ही अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि अधिसूचना प्रसिद्ध झाल्याची माहिती देखील पत्रकारांना दिली़ त्यामुळे आता नगरपंचायतीच्या या श्रेयवादात भूमकर, सोपलांसोबत आ़ राऊत यांनी देखील उडी घेतल्याची चर्चा सुरू आहे.