श्रीपूर : माळेवाडी (बोरगाव) मध्ये झालेल्या घटनेमुळे गावाची बदनामी झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामस्थ याबाबत म्हणणे मांडणार आहेत. सर्व समाज एकत्र बसून मार्ग काढू असे माळेवाडी (बोरगाव) गावाच्या वतीने भाजप कार्यकारिणी सदस्य राजकुमार पाटील यांनी सांगितले.
ग्रामपंचायत वरील अंत्यसंस्कार प्रकरणावर अकलूज येथे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. ही घटना कशामुळे घडली याबाबत त्यांनी सांगितले. यावेळी हिंमतराव पाटील, माळेवाडी (बोरगाव) मधील ग्रामस्थ उपस्थित होते.
माळेवाडी हे गाव जेमतेम हजार लोकसंख्येचे असणारे गाव आहे. माळेवाडी (बोरगाव) चा एक भाग असला तरी एक स्वतंत्र विचार धारणेची रचना असणारे गाव आहे. गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती सुसंस्कृत व सुशिक्षित आहे. या ठिकाणचे अनेक व्यक्ती जिल्हाधिकारी, डीएसपी, डीवायएसपी, कृषी खात्यामध्ये अधिकारी ते शिक्षक अशा उच्च पदावर काम करीत आहेत. येथील लोक जास्त करून राजकारणात नसतात. स्वत:चे काम भले अशी भूमिका येथील नागरिकांची आहे. २० ऑगस्ट रोजी घटनेमुळे हे गाव पूर्ण हादरून गेले. एका समाजाच्या व्यक्तीचे २० ऑगस्ट २०२१ रोजी निधन झाले. त्यांच्यावर माळेवाडी (बोरगाव) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. परंतु स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने तेथील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातून अंत्ययात्रा नेण्यासाठी विरोध केला. काही महिन्यापूर्वी मृताच्या नातेवाईकांनी त्या शेतकऱ्यावर दोन जातीवाचक शिवीगाळीच्या केसेस केल्या होत्या. त्यामुळे संबंधित शेतकरी त्यांच्या शेतातून जाण्यासाठी मनाई केली. तरी सुद्धा त्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी मृतांच्या नातेवाईकांनी ग्रामपंचायत समोर अंत्यविधी केला. त्या घटनेपासून येथील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. गावाची बदनामी होत आहे हे थांबले पाहिजे अशी अपेक्षा भाजपचे कार्यकारी सदस्य पाटील यांनी सांगितले.
----
२०१५ साली गावाला महाराष्ट्र शासनाने तंटामुक्त गाव म्हणून जाहीर केले आहे. तरीसुद्धा रस्त्याच्या वादावरून माळेवाडी (बोरगाव) मध्ये १२ एप्रिल २०२१ रोजी पहिली ॲट्रॉसिटी दाखल झाली. दुसरी ॲट्रॉसिटी १८ मे २०२१ रोजी झाली. वाद मिटवण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेत पण ते निष्फळ ठरले. या घटनेवरून माळेवाडी (बोरगाव) गावाची बदनाम करू नका. आमची सामंजस्याने भूमिका राहणार आहे.
- राजकुमार पाटील
भाजप कार्यकारिणी सदस्य