बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे संस्कार रुजविणारी एक कल्पक सुरुवात येथील जटायू अक्षरसेवा या संस्थेने केली आहे. ‘ए’ फॉर अॅपल, ‘बी’ फॉर ‘बॅट’ सोबतच आता ‘ए’ फॉर आंबेडकर, ‘बी’ फॉर भगतसिंग, ‘सी’ फॉर चाणक्य आणि ‘डी’ फॉर दयानंद... अशी धुळाक्षरे अनेक पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये घुमत आहेत.
सोलापुरातील काही युवकांनी एकत्र येऊन त्यांच्या जटायू अक्षरसेवा या प्रकाशन संस्थेमार्फत ही अभिनव शिक्षण पद्धती आणली आहे. देशभक्तीचा हा चार्ट सोशल मीडियात व्हायरल होताच केरळ, हिमाचल, मध्यप्रदेश अरुणाचल प्रदेशातील शाळांतूनही याला मागणी येऊ लागली. आज सोलापूरसह महाराष्ट्रातील अनेक नर्सरीजमध्ये देशभक्तीचा संस्कार देणारा हा अभ्यासक्रम सुरू झाला आहे.
अरुणाचल प्रदेशात दुर्गम भागातील ६६ बालवाड्यांमधील मुले ‘ए’ टू ‘झेड’ देशभक्ती चार्ट म्हणून दाखवतात. शिशू शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सुषमा स्वामी म्हणाल्या, ‘ए’ फॉर अॅपल रुटीन झालं; पण या चार्टमुळे आपल्या महापुरुषांची माहिती मुलांना होते. आमच्या नर्सरीत आम्ही ‘ए’ फॉर अॅपलही शिकवतो आणि ‘ए’ फॉर आंबेडकरही. ‘के’ फॉर कलाम एपीजे, ‘ज’ फॉर जमशेटजी टाटा, ‘एम’ फॉर मंगल पांडे, ‘व्ही’ फॉर विवेकानंद.. अशी नावे आपल्या मुलांच्या तोंडून ऐकून पालक आनंदित होतात. अरुणाचल प्रदेशात अरुण ज्योती, विवेकानंद केंद्र विद्यालय या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेले जीवनव्रती व शिक्षणतज्ज्ञ रूपेश माथूर म्हणाले, या चार्टमुळे इंग्लिश शिकतानाच आपल्या संस्कृतीचा परिचय देण्यात आल्याने अरुणाचलातील अतिदुर्गम भागातही भारतीय संस्कृतीबरोबर मुले इंग्रजी शिकू लागले आहेत.
विदेशातही लोकप्रियथायलंडसारख्या देशातील मूळ भारतीयांना आपल्या मुलांना भारताशी जोडण्यासाठी हा चार्ट एक सशक्त माध्यम वाटत आहे. नुकतेच थायलंड येथील आयटी इंजिनियर आशिष करपे यांनी ५० चार्ट मागवून घेतल्याची माहिती ‘जटायू’चे संतोष जाधव यांनी दिली. या चार्टने आपण प्रभावित झालो असून, येत्या काळात युरोप, अमेरिकेतील भारतीय मुलांपर्यंत हा चार्ट पोहोचवण्यासाठी आपण वैयक्तिक प्रयत्न करणार असल्याचे करपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
राष्ट्रीय विचारांवर साहित्य निर्मिती हा विचार घेऊन आम्ही काम सुरू केले. सर्व स्तरातून मिळत असलेला प्रतिसाद आम्हाला प्रोत्साहित करणारा आहे. ९७६७२८४०३८ वर मिस्ड कॉल देऊन चार्ट मागवण्याचे आवाहन ‘लोकमत’च्या माध्यमातून करत आहे.- संतोष जाधव, प्रमुख, जटायू अक्षरसेवा