रत्नागिरी : जिल्हाधिकारी बनून रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा या, अशी भावनिक साद मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांना जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी अनेकांनी घातली. या निरोप समारंभाच्या वेळी अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्यासह अनेकांचे डोळे यावेळी भरुन आले होते. काळम यांची सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदावर नियुक्ती झाली आहे. कर्मचारी, अधिकारी आणि पदाधिकारी यांनी काळम यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिष जगताप, उपाध्यक्ष सतीश शेवडे, आरोग्य व बांधकाम सभापती डॉ. अनिल शिगवण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रज्ञा धनावडे, शिक्षण व अर्थ समिती सभापती ऐश्वर्या घोसाळकर, समाजकल्याण सभापती शीतल जाधव, लेखा व वित्त अधिकारी साळुंखे, सदस्य उदय बने, राजापूरचे गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, उपशिक्षणाधिकारी भारती संसारे, अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांनी काळम यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.. प्रशासन व शासनाने हातात हात घालून काम केल्यास कारभार लोकाभिमुख होऊ शकतो, हे काळम यांनी दाखवून दिले, असे अध्यक्ष राजापकर म्हणाले. आजपर्यंतच्या आलेल्या सर्वच समस्या त्यांनी सोडवल्या. पण, न होणारे कामही त्यांनी प्रामाणिकपणे नाही म्हणून सांगितले. तसेच सकारात्मक दृष्टीकोन ठेवून त्यांनी जिल्ह्याचा विकास साधला. जिल्ह्याचे कलेक्टर बनून या, या लाल भूमीची सेवा करा, असे आवाहनही अध्यक्ष राजापकर यांनी केले. हा सत्कार हृदयस्पर्शी व भावनेला हात घालणारा आहे, असे सांगतानाच काळम यांचे डोळे पाणावले होते. ते म्हणाले, येथे जे प्रेम, आदर व मान दिलात, तो कधीही विसरणार नाही. त्यामुळे येथून मी खूप घेऊन जात आहे. मी आजपर्यंत येथे संधीचे सोने करण्याचा प्रयत्न केला. जीवनात चढउतार असतात. इसीजीच्या सरळ रेषा या मृत्यूच्या असतात, असे सांगताच त्यांनी चित्र काय काढलेय हे मी सांगणार नाही, असेही ते म्हणाले. शेवटी कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचे त्यांनी आभार मानले. (शहर वार्ताहर)सेनेचे लक्ष असेलआपण सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्याकडे शिवसेनेचे नक्कीच लक्ष असेल. सेवानिवृत्तीनंतर आपण आपले शिवसेना कार्यकारीप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे तुमच्या नावाची नक्कीच शिफारस करु, असे माजी अध्यक्ष उदय बने यांनी सांगून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
आता जिल्हाधिकारी बनून पुन्हा रत्नागिरीत या..!
By admin | Published: April 09, 2015 11:50 PM