पंढरपूर : पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्टÑवादीने आपली उमेदवारी नाकारून काम करणार्या सर्वसामान्य महिला कार्यकर्त्याला डावलले आहे व राजकीय पार्श्वभूमी असणार्या व्यक्तींनाच उमेदवारी देण्याची परंपरा कायम ठेवली असली तरी आपल्या उमेदवारीवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. निवडणूक लढविण्याची तयारी आपण गेल्या पाच वर्षांपासून केली आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत माघार न घेता निवडणूक लढविणारच असा पवित्रा राष्टÑवादीच्याच इच्छुक बंडखोर शैला धनंजय गोडसे यांनी घेतला आहे. २००९ मध्येही त्यांनी निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी केली होती; मात्र ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेत पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती. त्यावेळी पक्षाने तुमचा पुढच्यावेळी निश्चित विचार केला जाईल, असे आश्वासनही दिले होते. त्यानुसार मागील पाच वर्षांपासून आपण कसल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच, अशी मानसिकता ठेवून पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरमध्ये पदवीधरांचे विविध प्रश्न सोडविल, असे गोडसे म्हणाल्या. संपूर्ण मतदारसंघात सर्व्हे करून तब्बल १ लाख ५० हजार नवीन पदवीधरांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केला. पक्षासाठीही वेळोवेळी काम केले; मात्र पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे आपण निराश झालो नाही. पक्षाची उमेदवारी असो अथवा नसो आपण गेल्या पाच वर्षांपासून या पदवीधर मतदारसंघात केलेल्या कामाची पोहोच पुणे पदवीधर मतदारसंघात आपणाला निश्चित मिळेल. पदवीधरांशी असलेला आपला मोठा संपर्क, पक्षासह इतर पक्षातील लोकांचा आजपासूनच मिळत असलेला पाठिंबा, यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वासही शैला गोडसे यांनी व्यक्त केला. सोलापूर जिल्ह्यातून कोणीही इच्छुक नव्हते अथवा निवडणुकाही लढविलेल्या नाहीत. याशिवाय त्या महिला उमेदवार आहेत म्हणून त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र पक्षाने त्यांच्याबाबत पुन्हा थांबा आणि पहाची भूमिका घेतली असली तरी त्यांची थांबण्याची मन:स्थिती नाही. त्या निवडणूक लढविणारच, हे आता स्पष्ट झाले आहे.
...आता माघार नाहीच
By admin | Published: May 26, 2014 12:39 AM