सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीत सहाही उमेदवार मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाले. नव्याने सोलापूर विभाग झाल्यामुळे आपणाला चांगले स्थान मिळावे. आता परिषदेच्या कार्यकारिणीत सोलापूर जिल्ह्याला प्रतिनिधीत्व मिळायला हवे, असे आग्रही मत आमदार दिलीप सोपल यांनी आज येथे व्यक्त केले.
नियामक मंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सोपल यांच्या हस्ते सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर शाखेचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश यलगुलवार, उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंके, महानगर शाखेचे अध्यक्ष प्रा. अजय दासरी, समर्थ बँकेचे संचालक प्रशांत बडवे, मंगळवेढा शाखेचे अध्यक्ष डॉ. सुभाष कदम, पंढरपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. मंदार सोनवणे, अकलूज शाखेचे अध्यक्ष प्रा. विश्वनाथ आव्हाड आदी मंचावर होते. यावेळी विजयी उमेदवार जयप्रकाश कुलकर्णी (उपनगरीय), आनंद खरबस (सोलापूर शाखा), दिलीप कोरके (पंढरपूर), चेतनसिंह केदार (सांगोला), सोमेश्वर घाणेगावकर (बार्शी), यतिराज वाकळे (मंगळवेढा) यावेळी उपस्थित होते. यावेळी ‘तेलेजू’ बालनाट्यातील कलावंत आणि पुरस्कारप्राप्त कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
सोपल म्हणाले, नियामक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले; पण निवडणूक झाली आणि सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. पुढील निवडणूक बिनविरोध करण्यात नक्की यश येईल. सोलापूर जिल्ह्याला नाटकाची मोठी परंपरा आहे. या जिल्ह्याने अनेक दिग्गज कलावंत चित्रपटसृष्टीला दिले, असेही ते म्हणाले.
यलगुलवार म्हणाले, हा विजय म्हणजे प्रत्येक उमेदवाराला नटराजाने दिलेला आशीर्वाद आहे. सर्वच जण मिळालेल्या संधीचे सोने करतील, याबद्दल मला विश्वास आहे. आगामी काळात दर महिन्याला प्रत्येक तालुक्यात नाट्यविषयक कार्यक्रम आयोजित केले जातील, अशीही ग्वाही त्यांनी दिली. प्रारंभी साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी केदार यांनीही मनोगत व्यक्त केले. अमोल धाबळे आणि अपर्णा गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी रंगकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिनेते....नेते !आमदार दिलीप सोपल यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत मिश्किल भाषण केले. ते म्हणाले, या मंचावरील यलगुलवार आणि प्रा. दासरी हे दोघे ज्याप्रमाणे अभिनेते आहेत, तसे ते राजकारणातील नेतेही आहेत. खरं म्हणजे आपल्या सर्वांचे गुरू सुशीलकुमार शिंदे हे अभिनेतेच आहेत. एक नाट्यकर्मी ते गृहमंत्री असा त्यांचा प्रवास आहे. जिल्ह्यातील सांस्कृतिक, साहित्यिक आणि सांगितिक उपक्रमांच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे असतात. आज ते या समारंभाला येऊ शकले नाहीत. त्यामुळे यलगुलवारांनी बॅटिंग करा, असे मला सांगितले; पण काय करायचे कौतुकाचा सोहळा आहे. कौतुकाच्या शब्दाने लोक शेफारून जातात. त्यामुळे या मंडळीचे काम पाहूनच कौतुक करेन. या विधानावर सभागृहात हशा पिकला.
शंभरावे संमेलन बार्शीत व्हावे!यलगुलवार म्हणाले, आमदार सोपल हे आनंददायी आहेत. ते जिथे जातात तिथे आनंद पसरवितात. स्वत:चे दु:ख विसरून इतरांना आनंद देतात. सांस्कृतिक क्षेत्राला नेहमीच त्यांचे पाठबळ लाभते. आता आगामी काळात १०० वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन होणार आहे. हे संमेलन जर मुंबईसोडून बाहेर कुठे होणार असेल; तर सोपल यांनी ते बार्शीतच आयोजित करावे, असे आवाहन यलगुलवारांनी केले.