सोलापूर : एखाद्या इमारतीमध्ये किंवा परिसरात कोरोनाचे तीनपेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यास तो ५० मीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येईल. महापालिका, पोलीस दल, उत्पादन शुल्क यासह विविध शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून शुक्रवारपासून दंडात्मक कारवाई सुरू होईल, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी सांगितले.
शहरात कोरोनाचा उद्रेक होतोय. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात गुरुवारी सायंकाळी प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, मनपा उपायुक्त धनराज पांडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे, एसटी महामंडळाचे प्रभारी विभागीय नियंत्रण अधिकारी दत्तात्रय चिकुर्डे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पी. शिवशंकर म्हणाले, राज्य शासनाच्या निर्देशानुसार विविध शासकीय कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक घेण्यात आली. या अधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. मास्क, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या व्यक्ती, मंगल कार्यालये, व्यापारी पेठांमध्ये कारवाई करण्याचे निर्देश दिले. कोरोनाच्या चाचण्यांसोबतच जास्तीत जास्त लसीकरण व्हावे याबाबतही निर्देश दिले आहेत.
एखाद्या भागात तीनपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले, तर तो परिसर रेड झोन म्हणून घोषित करण्यात येईल. ५० मीटर अंतरापर्यंतचा परिसर सील करण्यात येईल. प्रतिबंधात्मक क्षेत्रात कडक निर्बंध असतील.
पोलिसांच्या मदतीने होणार कॉन्टॅक्ट ट्रेसिंग
कोरोनाबाधित रुग्ण संपर्कातील व्यक्तींना शोधण्यासाठी एका आरोग्य केंद्राकडे २० जणांची टीम असेल. बाधित लोक संपर्कातील व्यक्तींची माहिती देत नाहीत. कोणत्या भागत फिरुन आले याचीही माहिती देत नाहीत; परंतु आता पोलिसांच्या मदतीने संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येईल. एका व्यक्तीच्या संपर्कातील जास्तीत २० लोकांना शोधण्याचे आदेश आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.
सकाळी ७ ते ११ वेळेतच भाजी विक्री
सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा, भाजीपाला मार्केटमध्ये गर्दी होऊ नये याची काळजी घेणार आहेत. शहरातील किरकोळ भाजी विक्रेत्यांना सकाळी सात ते दुपारी ११ या वेळेतच भाजी विक्री करण्यास परवानगी देण्यात येईल. मोकळ्या जागेत भाजी विक्री करावी यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. लोकांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.