सोलापूर : अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत अर्थात तीन दिवसांच्या आत संबंधित विमा कंपन्यांना नुकसानीची माहिती कळवणे बंधनकारक आहे. पूर्वीपासून ही अट असून आताही आहे. एखाद्या शेतकऱ्याला ७२ तासांपेक्षा अधिक काळ नुकसानभरपाईची माहिती देण्यास विलंब झाल्यास शेतकऱ्याला लाभापासून वंचित ठेवू नये, अशी सूचना शासनाने केली आहे. त्यामुळे पाच ते दहा दिवसापर्यंत नुकसानीची माहिती गोळा करताना विमा कंपन्या दिसत आहेत. पूर्वीच्या जाचक अटीतून सुटका झाल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आपत्ती काळात शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये, यासाठी शासन आणि विमा कंपन्या यांच्या माध्यमातून पिकांवर विमा उतरविला जातो. याचा लाभ लाखो शेतकरी दरवर्षी घेतात. शेतकऱ्यांना उशिरा का होईना विमा कंपन्यांकडून लाभ मिळतो, असे कृषी अधिकारी सांगतात. विमा कंपन्यांच्या निर्देशानुसार नुकसानीची माहिती लवकरात लवकर मोबाईल ॲप, टोल फ्री नंबर वर, ईमेल आयडी तसेच कृषी विभागाकडे ऑफलाइन पद्धतीने सादर करता येते.
..........
असे आहेत पर्याय
- 1. विमा कंपनीच्या ई-मेल आयडीवर नुकसानीची माहिती भरता येते.
- 2. तसेच विमा कंपनीने जाहीर केलेल्या टोल फ्री नंबरवर देखील माहिती सादर करता येते.
- 3. यासोबत नुकसानीची माहिती भरण्यासाठी विमा कंपनीने खास मोबाईल ॲप बनविला आहे. या ॲपवर देखील माहिती भरता येते.
- 4. तसेच कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने देखील नुकसानीची माहिती देता येते.
बदल काही नाही
विमा पात्र नुकसानीची रक्कम मिळवण्यासाठी पूर्वी जी अट होती किंवा नियमावली होती. त्याच नियमावली सध्या आहेत. विमा कंपन्यांच्या नियमात काही बदल झाला नाही. मात्र प्रत्येक विमा पात्र शेतकऱ्याला नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कृषी विभाग यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करतो.
- बाळासाहेब शिंदे, कृषी अधीक्षक, सोलापूर