साेलापूर : काॅंग्रेससाठी स्वातंत्र्यवीर सावरकर हा मुद्दा महत्त्वाचा नाही. महागाई, उद्याेगपती अदानींच्या खात्यावर २० हजार काेटी रुपये कुठून आले, सरकार ही माहिती का लपवतय, असे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असे स्पष्टीकरण काॅंग्रेसचे नेते, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिले.
काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय माेदी सरकारने घेतला. हा निर्णय बेकायदेशीर असून यामागे काय राजकारण दडलय याची माहिती देण्यासाठी काॅंग्रेस नेते अनेक शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेत आहेत. बागवे यांनी शुक्रवारी जिल्हा काॅंग्रेस भवनात भूमिका मांडली. यावेळी माजी आमदार रामहरी रुपनर, धनाजी साठे, जिल्हाध्यक्ष धवलसिंह माेहिते-पाटील, शहराध्यक्ष चेतन नराेटे, महिला अध्यक्षा हेमा चिंचाेळकर आदी उपस्थित हाेते. बागवे म्हणाले, भारत जाेडाे यात्रेनंतर माेदी आणि भाजपच्या पायाखालची वाळू सरकारली.
माेदी सरकार २०२४ ची निवडणूक जिंकण्याचा दावा करीत असले तरी ते घाबरलेले आहे. राहुल गांधी यांनी फेब्रुवारी महिन्यांत उद्याेगपती अदानी यांच्या खात्यात आलेल्या बेकायदेशीर पैशांचा मुद्दा उपस्थित केला. त्या दिवसापासून राहुल गांधी यांना त्रास देण्याचे काम सुरू झाले. देश, संविधान, लाेकशाही धाेक्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकर यांचा मुद्दा बाजूला ठेवण्याचा सल्ला काॅंग्रेसला दिला हाेता. यावर बागवे म्हणाले, हाेय आता हा विषय बाजूला गेला आहे. आमच्यासाठी महागाई महत्त्वाची आहे. सर्वधर्म समभाव महत्त्वाचा आहे.