सोलापूर : कोरोनामुळे मागील तीन महिन्यात रेल्वेचे उत्पन्न कमी झाल्याने रेल्वेचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे़ रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून आता मालवाहतूक व्यापक करण्यावर भर दिला देण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेसोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
रेल्वेची प्रवासी सेवा बंद असल्याने रेल्वेचे उत्पन्न कमी झाले आहे़ कोरोनाच्या काळात मालवाहतूक व पार्सल गाड्या सुरूच आहेत़ २०२४ पर्यंत रेल्वेने चालविलेल्या मालवाहतुकीचे प्रमाण दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता रेल्वेने उत्पन्न वाढीसाठी रोडमार्गे जाणारा माल व पारंपरिक वस्तू या रेल्वे मालवाहतुकीकडे वळविण्यासाठी व्यापक धोरण आखण्यात येत आहे़ त्याबाबत क्षेत्रीय व विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिटची स्थापना करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रमुख प्रदीप हिरडे यांनी दिली.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणावर आहे़ या भागात साखर, अन्नधान्य, शेतीमाल, चादर, टॉवेल, शेती अवजारे, खते, बी-बियाणे, औद्योगिक वसाहतीमध्ये निर्माण होणारा कच्चा व पक्का माल हा रेल्वेच्या मालवाहतुकीकडे वळविण्यासाठी प्रचार, प्रसार व प्रसिद्धी करण्यात येणार असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.
डेप्युटी चीफ कमर्शियल मॅनेजर व्यवसाय विकास युनिटचे सेक्रेटरी म्हणून काम पाहणार आहेत़ यांच्यामार्फत प्रस्तावित मालाचा प्रस्ताव एकत्रित करून अंतिम पाठपुरावा करण्यासाठी मुख्यालयातील व्यवसाय विकास युनिटकडे पाठविण्यात आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. साधारण: इतर वाहनांपेक्षा कमी दराने मालवाहतुकीला रेल्वे प्रशासन प्राधान्य देणार आहे़ त्यासाठी क्षेत्रीय व विभागीय स्तरावर योग्य पद्धतीने नियोजन सुरू असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले़ मागील काही महिन्यांपासून रेल्वेचे उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजनां करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.
आठवड्यातून एकदा होणार बैठक विभागीय स्तरावर आठवड्यातून एकदा यासंदर्भात बैठक करण्यात येणार आहे. या बैठकीत रेल्वेकडे ट्रॅफिक आकर्षित करण्याकरिता विविध आयडिया आणि सध्या रोडच्या माध्यमाने जाणाºया ट्रॅफिकमध्ये रेल्वेचा वाटा वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे़ मुख्यालय आणि विभागातील व्यवसाय विकास युनिटने देखील उद्योग आणि व्यापाराच्या प्रलंबित तक्रारीचे निराकरण करण्याचे लक्ष्य मध्य रेल्वेच्या सर्वच अधिकाºयांनी ठेवले आहे़
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे देशभरात रेल्वे प्रवासी सेवा बंद करण्यात आली, त्यामुळे पार्सल, मालवाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे देशामध्ये विशेष पार्सल गाड्यांची सेवा सुरू करण्यात आली. मालाची/वस्तूची वाहतूक जलद आणि सुरक्षित पाठविण्यासाठी रेल्वे मार्गाच्या पर्यायाचा वापर केला जातो. - शैलेश गुप्ता, डीआरएम, रेल्वे