सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून उजनी ते सोलापूर अशा समांतर जलवहिनीच्या ४०५ कोटीच्या वर्कआॅर्डरला स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कंपनीच्या संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष असिम गुप्ता यांनी दिली.
सोलापूर स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची अध्यक्ष असिम गुप्ता याच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामृहात झाली़ या बैठकीला महापौर शोभा बनशेट्टी, सभागृहनेता संजय कोळी, आयुक्त दिपक तावरे, नरेंद्र काटीकर, चंद्रशेखर पाटील, संदीप कारंजे, विजय राठोड, जी़ एम़ दुलंगे, लक्ष्मण चलवादी आदी उपस्थित होते़ या बैठकीत कंपनीतर्फे सोलापुरात सुरू असलेल्या कामावर चर्चा करण्यात आली.
सध्या स्मार्ट सिटीच्या विविध कामावर आतापर्यंत ५७ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहे़ केंद्रशासनाकडून सोलापूरला ३०० कोटी रूपये मिळाले़ लवकरात लवकर काम पूर्ण करून समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती संचालक मंडळाने दिली.