सोलापूर : आॅनलाईन खरेदी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर खातेदाराने ई-फेरफार नोंदीसाठी तलाठ्यांकडे हेलपाटे मारायची गरज नाही. खरेदी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर व्यवहाराची पूर्ण माहिती तलाठी लॉगिनला उपलब्ध होणार आहे. तलाठ्यांनी १५ दिवसांच्या आत माहितीची पडताळणी करून फेरफार नोंदी तयार करायच्या आहेत. ही प्रक्रिया सोलापूर जिल्ह्यातही सुरू झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
तेली म्हणाले की, दुय्यम निबंधक कार्यालयातून प्राप्त होणाºया नोंदणीकृत दस्तांच्या आधारे महसूल यंत्रणेकडून ई-फेरफार तयार केले जातात. यासाठी तहसील कार्यालयात फेरफार कक्षही स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षात एक अव्वल कारकून, दोन तलाठी संवर्गातील कर्मचाºयांचा समावेश असतो.
नोंदणीकृत दस्त आल्यानंतर या कक्षाच्या माध्यमातून फेरफारची नोटीस (नमुना ९) तयार करुन संबंधितांना पाठवली जाते. परंतु, शासन आदेशानुसार १ जुलैै २०१८ पासून हा कक्ष बंद करण्यात आलेला आहे. यापुढील काळात दुय्यम निबंधक कार्यालयाकडून नोंदणीकृत दस्तांची माहिती थेट तलाठी लॉगिनला प्राप्त होईल. त्यावर तलाठ्यांनी योग्य ती कार्यवाही करुन फेरफार घेण्याची प्रक्रिया करावी, असे आदेश दिले आहेत. नव्या प्रक्रियेमुळे तलाठ्यांच्या स्तरावर होणाºया अर्थपूर्ण व्यवहारांना लगाम बसणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
सामान्य माणसाला काय फायदा? - जुन्या पध्दतीनुसार, दस्त नोंदणी केल्यानंतर खातेदाराला एक अर्ज, इंडेक्स आणि नोंदणी दस्ताची झेरॉक्स घेऊन तलाठ्याकडे जावे लागते. तलाठी भाऊसाहेब जागेवर असतील तर खरे, अन्यथा ते येईल तोपर्यंत हेलपाटे मारावे लागतात. आता दस्त नोंदणीची माहिती आॅनलाईन तलाठी लॉगिनला येईल. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी खातेदारांना नोटिसा बजावून माहितीची पडताळणी करायची आहे. यासाठीही कालावधी निश्चित करुन देण्यात आला आहे. माहितीची पडताळणी केल्यानंतर त्यासंदर्भातील अहवाल मंडल अधिकाºयांना पाठविला जाईल. मंडल अधिकारी उताºयावरील ई-फेरफार नोंदी निश्चित करून घेतील.