सोलापूर : कोलकाता येथे ‘एडिनो व्हायरस’ने डोकेदुखी वाढवली आहे. महाराष्ट्रातही शाळकरी मुलांमध्ये हा व्हायरस वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, अजून तरी या व्हायरसचा धोका सोलापूर शहरासोबत जिल्ह्यातील एकाही बालकाला झाला नाही. मात्र, प्रतिबंधात्मक काळजी घेत सावधगिरीने एडिनो व्हायरसला हरवलं जाऊ शकतं, असं सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.
कोरोनामुळे आधीच संकटातून बाहेर आलेल्या अनेक लोकांना आता नव्या व्हायरसच्या धोक्यामुळे आणखीन भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. एडिनो व्हायरस हा एक विषाणूजन्य आजार आहे, त्यामुळे कोणत्याही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने संसर्ग पसरू शकतो. कोरोना व्हायरसप्रमाणेच हा व्हायरस देखील हवेतून म्हणजेच खोकल्याने किंवा शिंकण्याने पसरतो, असेही सांगण्यात आले आहे.
एडिनो व्हायरससाठी कोणतेही विशिष्ट औषध किंवा उपचार नाही. बऱ्याच वेळा, ऑडिनो व्हायरस संसर्गामध्ये सौम्य लक्षणे असतात आणि वेदना किंवा ताप यावर औषधाने बरे केले जाऊ शकते. त्यामुळे घाबरू नका, अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.