सोलापूर : धर्मवीर संभाजी तलावातील गाळ काढण्यासाठी सर्व तयारी झाली आहे. आता आयआयटी चेन्नईच्या अहवालाची प्रतीक्षा असून, ते सोमवारी महापालिकेकडे येणार आहे. या अहवालाची फेरतपासणी झाल्यानंतर प्रत्यक्षात गाळ काढण्याला सुरुवात होणार आहे.
संभाजी तलावाचे कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या धर्तीवर सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तलावात पुन्हा जलपर्णी येऊ नये, यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेत संभाजी तलावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार केंद्र सरकारतर्फे निधी मिळाला आहे. या अनुषंगाने तलावातील गाळ काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. २०१३ मध्ये एका खासगी कंपनीद्वारे तलावातील गाळाचे सर्वेक्षण झाले होते. त्यानुसार तलावामध्ये दोन लाख ७० हजार क्यूबिक मीटर इतका गाळ आहे. आता पुन्हा तलावात किती गाळ आहे हे मोजण्यात येत आहे.
तलावातील गाळ काढण्यासाठी तामिळनाडू येथील कंपनीला काम देण्यात आले आहे. आयआयटी चेन्नईच्या पथकाने मागील आठवड्यामध्ये तलावातील परिसराचे निरीक्षण केले. जीपीएसच्या माध्यमातून सेन्सरच्या मदतीने त्यांनी तलावात किती गाळाचे प्रमाण मोजले आहे. याचा अहवाल प्रतीक्षेत आहे. तलावातील गाळ हा शेजारी असणाऱ्या खाणींमध्ये टाकून गाळासोबत आलेले पाणी पुन्हा तलावात सोडण्यात येणार आहे. यासाठी ७०० मीटरच्या पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्री लेव्हल आणि पोस्ट लेव्हलवरून ठरणार मोबदला
तलावातील गाळ किती आहे हे तपासण्यासाठी गाळ काढण्याआधी (प्री लेव्हल) तलावाची खोली मोजण्यात आली आहे. या अहवालाची फेरतापसणी झाल्यानंतर प्रत्यक्ष गाळ काढण्यात येईल. गाळ काढल्यानंतर (पोस्ट लेव्हल) तलावाची खोली पुन्हा मोजण्यात येईल. या प्री लेव्हल आणि पोस्ट लेव्हलचे प्रमाण तपासून किती गाळ काढला हे स्पष्ट होणार आहे. गाळ काढल्यानंतर तलावाची खोली किती वाढली यावरून कामाचा मोबदला देण्यात येईल.
******