ऑनलाइन लोकमत/अप्पासाहेब पाटील
सोलापूर, दि. 26 - महावितरणच्या प्रणालीमध्ये मोबाइल क्रमांक नोंदवलेल्या वीजग्राहकांना आता मराठी भाषेतही सेवा देणे शक्य झाले आहे. वीज बिलांसह इतर विजसेवेसंबंधीची माहिती एसएमएसद्वारे आता मराठीतही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महावितरणच्या वतीने सध्या मोबाईल क्रमांक नोंदवलेल्या ग्राहकांना वीजबिल व इतर सेवासंबंधीची माहिती सध्या एसएमएसद्वारे केवळ इंग्रजी भाषेतच दिली जात आहे. मात्र आता ग्रामीण भागातील वीजग्राहकांच्या भाषेची अडचण लक्षात घेऊन मराठी भाषेतही एसएमएस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्राहकांचे वीजबील तयार होताच ग्राहकाने किती वीज वापरली, मीटर रीडिंग, एकूण वीजबील, सध्याचे रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख, देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा खंडित ठेवण्याची वेळ अशा प्रकारची माहिती वीजग्राहकांना देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
त्याचबरोबर वीजपुरवठा खंडीत झाल्यास अथवा यंत्रणेत बिघाड झाल्यास संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा कधी सुरू होणार आहे याची माहितीही एसएमएसद्वारे मराठीत तातडीने मिळणार आहे. यासाठी वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदविला असेल तर नोंदविलेल्या क्रमांकावरून मराठी भाषेसाठी MLANG टाईप करून स्पेस देऊन आपला बारा आकडी ग्राहक क्रमांक टाकावा.
त्यानंतर स्पेस देऊन १ क्रमांक टाकून 9225592255 या क्रमांकावर पाठवावा. इंग्रजी भाषेसाठी MLANG टाईप करून स्पेस देऊन आपला बारा आकडी ग्राहक क्रमांक टाकावा. त्यानंतर स्पेस देऊन २ क्रमांक टाकून 9225592255 या क्रमांकावर पाठवावा.
बारामती परिमंडलात २० लाख ग्राहकांची नोंदणी
बारामती परिमंडलातील २० लाख ४ हजार २८० ग्राहकांनी महावितरणकडे आपला मोबाईल क्रमांक नोंदवला आहे. यात बारामती मंडलातील ४ लाख ६६ हजार ५१८, सातारा मंडलातील ७ लाख ९४ हजार ९९ तर सोलापूर मंडलातील ७ लाख ४३ हजार ६६३ वीजग्राहकांचा समावेश आहे. विजेसंबंधीच्या सेवांची माहिती मोबाईलवर मिळवण्यासाठी ग्राहकांनी आपला क्रमांक १९१२, १८००-२००-३४३५, १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर अथवा जवळच्या शाखा किंवा उपविभाग कार्यालयात नोंदवावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.