सोलापूर : ग्राहकांना ऑनलाईनद्वारे आपल्या वीजबिलाचा भरणा सुलभतेने करता यावा व अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रेडीट कार्डचा अपवाद वगळता नेट बँकिंग, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड, डेबिटकार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास महावितरणने अशा ग्राहकांना ही सेवा नि:शुल्क केली आहे.
महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे (www.mahadiscom.in) व महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे ग्राहक वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करू शकतात. ऑनलाईन वीजबिलाचा भरणा करताना केवळ क्रेडीट कार्डद्वारे भरणा केल्यास ग्राहकांना शुल्क आकारण्यात येईल. उर्वरित इतर सर्व पद्धतीने (नेट बँकींग, यूपीआय, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड) वीजबिलाचा भरणा केल्यास ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्यास ग्राहकास त्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावर Payment History तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. ऑनलाईन वीजबिल भरणा पद्धत अत्यंत सुरक्षित असून यासंदर्भात काही तक्रार अथवा शंका असल्यास ग्राहक helpdesk_pg@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर महावितरणशी संपर्क साधू शकतात.
ग्राहकांनी वीजबिल भरणा केंद्रासमोर रांगेत उभे राहून वीजबिल भरण्यापेक्षा महावितरणने उपलब्ध करुन दिलेल्या निशुल्क ऑनलाईन वीजबिल भरणा सेवांचा फायदा घ्यावा व वीजबिलाचा भरणा ऑनलाईन करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.