कुरुल : मला कसलीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. मैत्री वेगळी आणि समाजकारण वेगळे. गटतट, मतभेद बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत सदस्य ते आमदार, खासदार कुठल्याही पक्षाचा असला तरी फायदा करून घ्या. कुणी कितीही प्रयत्न केले तरी मोहोळ तालुक्याच्या राजकारणात अनगरच्या पाटील वाड्याशिवाय पर्याय नाही. सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय मंत्री होते. ४५ वर्षे सत्तेत होते. पण आता डोहाळ जेवणालाही चाललेत, किती रस्त्यावर आणले बघा तुम्ही त्यांना. माझे भाषण आज झाले. आता ते अनगरच्या वाड्यावर जाणारच बघा, असे विधान भाजपचे खासदार शरद बनसोडे यांनी केले.
अर्जुनसोंड येथील विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार बनसोडे म्हणाले, गावातील राजकारण इलेक्शनपुरते १५ दिवसाचं करा. बाकी समाजकारण करा. योजना सरकारची आहे. पक्षभेद न करता सर्वांसाठी देतो आहे. त्याचा सर्वांना फायदा झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
अर्जुनसोंड येथे खासदार निधीतून साडेसात लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे कुदळ मारून खा. बनसोडे यांनी भूमिपूजन केले. अध्यक्षस्थानी लोकनेते शुगरचे अध्यक्ष विक्रांत पाटील होते. भाजपचे खासदार शरद बनसोडे व राष्ट्रवादीचे बाळराजे पाटील हे अलीकडच्या काळात अनेकदा एकत्र आले आहेत. आगामी काळात होणाºया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे उमेदवार म्हणून निश्चित मानले जात आहेत. अशावेळी पाटील यांनी भाजपच्या खासदारांचे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याप्रसंगी भाजपचे प्रांतिक सदस्य शंकरराव वाघमारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, सज्जन पाटील, युवक अध्यक्ष राहुल मोरे, धनाजी गावडे, संतोष नामदे, मुकुं द ढेरे, सरपंच शुक्राचार्य हावळे, हनुमंत भोसले, अमोल पाटील उपस्थित होते.
यावेळी जि. प. सदस्य विक्रांत पाटील म्हणाले, गेली २५ वर्षे राष्ट्रवादी सत्तेत आहे. या चार वर्षात पहिल्यांदाच असे झाले आहे की, पं. स., जि. प., खासदार कोणीच आमच्या पक्षाचा नाही. आमचा आमदार असून, नसल्यासारखा आहे. विकासासाठी कार्यकर्ता झपाटलेला आहे.
गेली ५० वर्षे अनगरच्या शिवाजी चौकात कोणी विरोधकांनी सभा घेतली नाही. ती तुम्ही राजन पाटील यांच्या सहकार्याने घेऊन दाखवली. तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायती या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असूनही पक्षभेद न करता खासदार बनसोडे यांनी सर्व ग्रामपंचायतींना निधी दिला. विरोधकांनाही कसे जवळ करून आपलेसे करावे, हे खासदार बनसोडे यांच्याकडून शिकावे, असे म्हणत बाळराजे पाटील यांनी बनसोडे यांचे कौतुक केले.
यावेळी सतीश कोळी, राहुल क्षीरसागर, शशिकांत पाटील, कैलास माळगे, बंडू ढेरे, भैय्या हावळे, शुभम हावळे, केशव हावळे, कालिदास गावडे, बबलू देवकते, प्रकाश तरंगे, आप्पा बंडगर, प्रमोद हावळे, महेश हावळे उपस्थित होते.
बनसोडे उवाच्....- ढोबळं बडबडलं अन् गडगडलं १४ हजार मतं मिळाली. पालकमंत्री होते तरीही कसले रापकिन आपटले. त्यांचे पाप आहेत. तुमचं वय काय, तुम्ही करताय काय? विरोधात जाऊन फक्त दोन मते मिळवून दाखवा. परवा झालेले आमदार तराटगडी. तुकाराम मुंढेंना शिव्या द्यायची काय गरज होती? निवळ येडं माणूस. नसते मालक तर जिंकले कोणाच्या जीवावर? थोड लाज तरी वाटावी माणूस म्हणून.