राकेश कदम
सोलापूर : राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी)च्या धसक्यामुळे महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातून जन्म दाखले घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. यापूर्वी जन्म-मृत्यूचे दाखले देण्यासाठी आठ दिवसांचे ‘वेटिंग’ होते. आता एक महिन्यानंतर या, असे सांगितले जात आहे.
मोदी सरकारने नागरिकत्व कायदा मंजूर करताना एनआरसी लागू करण्याचे स्पष्ट संकेत दिले. सीएए, एनआरसीविरोधात देशभरात मोर्चे निघाले. सोलापुरातही १५ ते २० दिवसांत पाच आंदोलने झाली. या कायद्याच्या समर्थनार्थही आंदोलने झाली. दुसरीकडे महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात गर्दी वाढल्याचे चित्र आहे. एनआरसीमुळेच ही गर्दी होत आहे. आधीच या कार्यालयात कर्मचाºयांची संख्या कमी आहे. त्यात वाढत्या गर्दीने कामाचा ताण येत असल्याचे या कार्यालयातील कर्मचारी सांगत आहेत. केंद्र सरकारने जन्म-मृत्यूचे दाखले देण्यासाठी सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम (सीआरएस) ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून या पोर्टलच्या आधारचे संगणकीकृत दाखले दिले जातात. हस्तलिखित दाखले देण्याची पद्धत आता बंद झाली आहे. वाढत्या गर्दीमुळे हे सर्व्हरही डाऊन होत असल्याची माहिती कर्मचाºयांनी दिली.
उपनिबंधक संदीप कुरडे यांना प्रस्तुत प्रतिनिधीने विचारलेले प्रश्न अन् त्यांनी दिलेली उत्तरे
- प्रश्न - जन्म-मृत्यूची प्रमाणपत्रे देण्यासाठी एक महिन्याची प्रतीक्षा का?
- उत्तर - एनआरसीचा धसका. लोक घाबरुन गर्दी करीत आहेत.
- प्रश्न - एनआरसीमुळेच गर्दी होतेय, याला आधार काय?
- उत्तर - एक महिन्यापूर्वी जुने जन्मदाखले मिळावेत, यासाठी दररोज ३० ते ३५ अर्ज यायचे. आता दररोज किमान ३०० पेक्षा जास्त अर्ज येत आहेत.
- प्रश्न - यापूर्वी गर्दी झालीच असेल ना?
- उत्तर - जनधन योजनेसाठी बँकेत खाती काढायची होती त्यावेळी काही अर्ज आले होते. पण एवढी गर्दी नव्हती. आता अनेक ज्येष्ठ लोकांचे अर्ज आहेत. १९९० पूर्वी जन्मलेल्या लोकांचे जन्मदाखले मिळावेत, यासाठी त्यांची मुले, मुली आणि अनेक नागरिक स्वत:हून येत आहेत.
- प्रश्न - हे लोक नेमके कोण आहेत?
- उत्तर - बहुतांश लोक मुस्लीमच आहेत. शहरात नाही तर शहराबाहेरूनही लोक येत आहेत.
- प्रश्न - मग वेळेत प्रमाणपत्र द्यायची अडचण काय?
- उत्तर - जुने जन्मदाखले द्यायचे असतील तर अभिलेखापाल कक्षातील नोंदवह्या तपासाव्या लागतात. पूर्वी या कक्षात पाच लोक कार्यरत होते. आता केवळ दोन माणसे आहेत. या नोंदवह्या काढणे, अर्जाची पडताळणी करणे याला बराच वेळ लागतो. नोंद नसेल, नोंदवहीतील कागदं खराब किंवा गहाळ झाली असतील तर अडचण येते.
- प्रश्न - नोंदवहीतील पाने फाटली किंवा नोंद नसेल तर तुम्ही काय करता?
- उत्तर - अशा नागरिकांना आम्ही मुनिसिपल कोर्टात अर्ज करायला सांगतो. तिथे कागदपत्रांची पडताळणी होते. वकिलांमार्फत युक्तिवाद वगैरे होतो.
उद्या त्रास नको म्हणून आताच काळजी - गुडूमा जमादार- गुडूमा इब्राहिम जमादार या गेली अनेक वर्षे महापालिकेत लोकांची कामे घेऊन येतात. मनपातील जवळपास सर्व खातेप्रमुख, कर्मचारी त्यांना ओळखतात. सोमवारी सायंकाळी त्या जन्म-मृत्यू उपनिबंधक संदीप कुरडे यांच्या कार्यालयात बसल्या होत्या. ‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणााल्या, आमचं लोक घाबरलेत हे खरं आहे. माझा मावसभाऊ मंत्रालयात असतो. परवा त्याला फोन करून या कायद्याबद्दल विचारले. एकदा सरकारने कायदा लागू केला तर सर्वांना मान्य करावा लागेल, असं तो मला सांगत होता. सरकारचा एनआरसीचा कायदा लागू होणार आहे. म्हणून आमचे लोक दाखले काढायला महापालिकेत येत आहेत. उद्या त्रास नको म्हणून लोक आता गर्दी करीत असतील, असेही गुडूमा म्हणाल्या.