सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील एनटीपीसी प्रकल्पासाठी आहेरवाडी व फताटेवाडी येथील शेतकºयांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. या प्रकल्पासाठी जमिनी संपादित केलेल्या शेतकरी कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले होते. मात्र नोकरी देणे शक्य होणार नसल्याने प्रती कुटुंबास पाच लाख याप्रमाणे मदतनिधी देण्यात येत आहे. यासाठी दहा कोटींचा निधीही प्राप्त झाला असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
यावेळी पाटील म्हणाल्या, लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पुनर्वसन खात्याच्या वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत शेतकरी कुटुंबांना नोकरीऐवजी पाच लाख निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार प्रांताधिकारी कार्यालयाकडे १0 कोटींचा निधी देण्यात आला असून, आचारसंहितेपूर्वीच त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
या प्रकल्पात शेती गेलेल्या ४२२ कुटुंबांना हा मदतनिधी देण्यात येत आहे. कंपनीकडून प्राप्त झालेला १० कोटींचा निधी अपुरा असून, यासाठी २१ कोटींचा निधी अपेक्षित असणार आहे. वाढीव निधीचाही प्रस्ताव कंपनीकडे पाठविण्यात येत आहे.
प्रकल्पबाधित शेतकºयांच्या पुनर्वसनासाठी यापूर्वी प्रती एकरी अडीच लाख रुपयांचा पुनर्वसन निधी देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार प्रांताधिकारी कार्यालयाकडे ४७ कोटी २८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यापैकी ३१ कोटी ४९ लाख रुपयांचा पुनर्वसन निधी शेतकºयांना देण्यात आला आहे. उर्वरित शेतकºयांना पुनर्वसन निधी देण्यासाठी १५ कोटींचा निधी शिल्लक असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.