टेंभुर्णी शहर हे पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतुकीचे जंक्शन असल्याने येथे ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने, शहरातील रुग्णांची संख्या वाढण्यात भर पडत आहे. सोमवारअखेरपर्यंत रुग्णांची संख्या ३०८ असून, करोना सेंटरमध्ये ३५ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ७३ रुग्ण उपचार घेत आहेत, तर होम क्वारंटाइन २०० आहेत. आतापर्यंत २६ लोकांचे मृत्यू झालेले आहेत. विशेष म्हणजे, सध्याचा कोरोना हा लहान मुलांनाही लागू होत असल्याने चार मुले ही पॉझिटिव्ह आली आहेत. त्यामुळे मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या मुलांना ठेवायचे कुठे आणि ती कशी राहणार याबाबत संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. आतापर्यंत रॅपिड टेस्ट ६ हजार ३५६ लोकांचे केली आहेत. यामध्ये १,१४४ लोक पॉझिटिव्ह आले आहेत, तर २,१०७ लोकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये ६०९ लोक पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्याची वाढती रुग्णसंख्या लक्षात सध्या चालू असलेले कोविड सेंटर अपुरे पडत असल्याने, आ.बबनराव शिंदे यांच्या प्रयत्नातून आपण दुसरे कोरोना सेंटर अकलूज रोड येथे चालू करत आहोत, असे सरपंच कुटे यांनी सांगितले.
---
अपुऱ्या लसीअभावी लसीकरण थांबले
आ.शिंदे यांनी कारखान्याच्या माध्यमातून टेंभुर्णी कोरोना सेंटरसाठी आतापर्यंत तीन ऑक्सिजन मशीन दिले आहेत.
टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आतापर्यंत २,३१३ लोकांना लसीकरण झाले आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने अनेक लोकांना परत जावे लागत आहे. कमीतकमी दिवसाला दीडशे लस उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे सरपंच कुटे यांनी सांगितले.