सोलापूर : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजारांहून अधिक झाली आहे. यापैकी १ हजार ८१ जणांचा मृत्यू झाला असून, २१ हजार २०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
शहरात १२ तर ग्रामीणमध्ये २४ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. जुलैपर्यंत शहरात संसर्ग वाढला होता. त्यानंतर आॅगस्टमध्ये शहरात संसर्ग कमी तर ग्रामीणमध्ये जास्त वाढल्याचे चित्र दिसून आले. ग्रामीणमध्ये एप्रिलमध्ये केवळ दोन पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू झाला होता. शहरातील रुग्णालय व मुंबई-पुण्याहून आलेल्या नातेवाईकांमुळे गावांमध्ये कोरोना आल्याची चर्चा सुरू झाली. मे महिन्यात ३८ पॉझिटिव्ह तर चार जणांचा मृत्यू झाला. जुलैमध्ये ही संख्या ३ हजार २९२ पर्यंत गेली. आॅगस्टमध्ये ७ हजार ८६८ पॉझिटिव्ह तर २२७ मृत्यू आणि सप्टेंबरमध्ये केवळ २३ दिवसात १० हजार ६४६ पॉझिटिव्ह तर २८८ जणांचा मृत्यू झाला. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णवाढ व मृत्यूचे प्रमाण जास्त दिसत आहे.
१२ एप्रिल रोजी शहरात पहिला कोरोनाचा बळी गेला. त्यानंतर २४ एप्रिल रोजी ग्रामीणमध्ये रुग्ण आढळला. मे महिन्यात रुग्णवाढीचा दर कमी होता. लॉकडाऊननंतर सर्व व्यवहार खुले झाल्यावर ग्रामीणमध्ये रुग्ण वाढत गेले. पहिल्या टप्प्यात दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळमध्ये रुग्ण आढळले. त्यानंतर बार्शी, पंढरपूर, माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला, मंगळवेढ्यात रुग्ण वाढत गेले. शहरात ८ हजार ६३ तर ग्रामीण भागात २२ हजारांचा आकडा पाच महिन्यांत पार झाला आहे.