तालुक्याच्या ग्रामीण भागात दुसऱ्या टप्प्यातील कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. शहरातील नागरिकांशी संपर्क आल्याने ही संख्या सातत्याने वाढत आहे. सहा दिवसांत ६०० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. मृतांची संख्या १० वरून ३१ पर्यंत गेली आहे. परस्पर संपर्क आणि कोरोनाविषयक जागृतीचा अभाव ही त्या मागची प्रमुख कारणे सांगितली जात आहेत.
शहरात मिळेनात बेड
तालुक्यात रुग्णावर उपचार करण्यासाठी मोठे रुग्णालय नाही. त्यांना उपचारासाठी सोलापूर शहरातील रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते. गेल्या आठवड्यात शहरातील रुग्णालयात एकही बेड उपलब्ध नाही ही चर्चा खेडोपाडी सर्वदूर पसरली. त्यामुळे अनेकांनी उपचारासाठी सोलापूरकडे येण्याऐवजी घरातच राहणे पसंत केले त्यामुळे मृतांची संख्या सहा दिवसांत तिपटीने वाढली.
पॉझिटिव्हच्या भीतीने तपासणीस नकार
आजार लपविण्याचे वाढते प्रमाण
किरकोळ स्वरूपाचे आजार आणि लक्षणे जाणवत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढले आहे. उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्यास चाचण्या करतात आणि मग पॉझिटिव्ह निघण्याच्या भीतीने अनेक जण आजार लपवत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. स्थानिक पातळीवर अशा रुग्णांना उपचारासाठी प्रवृत्त करण्याची यंत्रणा कमी पडत आहे. कोरोनाची तपासणी करण्याबाबतही अनास्था आहे.
अशी आहे तालुक्याची सद्यस्थिती
पॉझिटिव्ह रुग्ण : ९७२, मृतांची संख्या : ३१, उपचारानंतर बरे : ५६०, सक्रिय रुग्णांची संख्या : ३८१.
एनटीपीसी, मंद्रुप, अंत्रोळी आघाडीवर
एनटीपीसीमध्ये सर्वाधिक १३९ रुग्ण आढळले असून एकही मृत नाही. मंद्रूपमध्ये ७५ रुग्ण तर अंत्रोळी येथे ४८ रुग्ण असले तरी या दोन्ही गावात एकही मृत नाही. अन्य गावांतील सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या : होटगी १८ (२ मृत), मुस्ती १७ (१ मृत), बरूर २५ (२ मृत), गुंजेगाव २२ (२ मृत), विडी घरकुल ४० (३ मृत), तोगराळी ६ (३ मृत), वळसंग १५ (१ मृत), बोरामणी १६ (१ मृत), निंबर्गी १७, विंचूर १७.