अरण : महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांमधील ४0 हजार २८८ शाळा दुष्काळग्रस्त किंवा टंचाईसदृश भागातील आहेत. त्यामुळे या सर्व शाळांमधील आठवीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीतसुद्धा शालेय पोषण आहार दिला जाणार आहे. दररोजच्या शालेय पोषण आहारामध्ये आठवड्यातून तीन दिवस अंडी, दूध, फळे असा पौष्टिक आहार देण्यात येणार आहे.
दोन मेपासून शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालेली आहे. आता सहा मेपासून सोलापूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त घोषित तालुक्यांतील आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्यामध्येसुद्धा शालेय पोषण आहार शिजवून दिला जाणार आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर्व पात्र विद्यार्थी- विद्यार्थिनींना शालेय पोषण आहार व्यवस्थित मिळावा, यासाठी मोडनिंब विभागाचे जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे यांनी दोन मे रोजी अरण व मोडनिंब केंद्रशाळेतील मुख्याध्यापकांची संयुक्त बैठक अरण येथे घेतली. या बैठकीमध्ये सर्व मुख्याध्यापकांनी आपापल्या स्तरावर शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शालेय पोषण आहार व पूरक पोषण आहार देण्याची कार्यवाही करण्याबाबत आराखडा तयार करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.
शालेय पोषण आहाराचा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये येऊन विद्यार्थ्यांनी आस्वाद घ्यावा, यासाठी मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये येणाºया विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक खेळ, अवांतर वाचन, विविध छंद तसेच प्रोजेक्टरवरती उपयुक्त चित्रपट दाखवून विद्यार्थी शालेय पोषण आहार घेण्यासाठी उद्युक्त होतील आणि येतील, अशी व्यवस्था करण्याची अपेक्षा झेडपी सदस्य भारत शिंदे यांनी व्यक्त केली.या बैठकीला सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य भारत शिंदे, अरण केंद्राचे केंद्रप्रमुख विलास काळे, मोडनिंब केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष दाढे, प्राचार्य हरिदास रणदिवे, अरणचे ग्रामविकास अधिकारी हरिभाऊ दरवडे उपस्थित होते.