सोलापूर : उजनी धरणातून कुरुल शाखा कालव्याद्वारे मंद्रूप भागासाठी पाणी सोडण्यात आले होते. उर्ध्व भागातील शेतकऱ्यांनी दारे उघडल्यामुळे अडथळा निर्माण झाला. त्यामुळे पाणी परिसरातील टेलएंडच्या शेतापर्यंत पोहोचू शकले नाही. यात जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्यांचा दोष नसल्याचा निर्वाळा भीमा विकास विभाग क्र २ चे कार्यकारी अभियंता रमेश क्षीरसागर यांनी दिला आहे.
१२ मे पासून २३ मे दरम्यान गुंजेगाव, कंदलगाव, गावडेवाडी, येळेगाव, मंद्रूप परिसरातील शेतीसाठी कुरुल शाखा कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते, मात्र मायनर क्रमांक २४ च्या वरील फाट्याच्या शेतकऱ्यांनी लघु वितरिकेची दारे उघडझाप केल्याने पाणी पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला. आपण स्वतः साईटवर पूर्ण वेळ थांबून पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. याकामी पोलिसांची मदत घेतली तरीही त्याचा फारसा उपयोग होऊ शकला नाही अशी खंत कार्यकारी अभियंता रमेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
जलसंपदा विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. प्रत्यक्ष साइटवर काम करणारे कर्मचारी कमी असताना शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. कोरोनाच्या काळात माझ्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम केले. कोणताही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी कसोशीने प्रयत्न केले. तरीही शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी गेले नसेल तर तोकडी यंत्रणा आणि हेडच्या शेतकऱ्यांची असहकार्याची भूमिकाच त्याला कारणीभूत असल्याचेही त्यांनी सांगितले.
----