विठ्ठल परिवाराचे नेतृत्व करणारे आमदार भारत भालके यांचे निधन झाले आहे. विठ्ठल परिवारातील महत्त्वाचा भाग असलेले राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचेही निधन झाले आहे. त्याचबरोबर विठ्ठल परिवारात आमदार भारत भालके यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे कल्याणराव काळे हे भाजप अनिष्ट झाल्याने ते परिचारकांच्या गोटात सहभागी झाले आहेत. यामुळे आगामी काळात विठ्ठल परिवाराची धुरा यशस्वीरीत्या कोण सांभाळू शकते, असा प्रश्न कारखान्याचे सभासद, कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दुसरीकडे पंढरपूरच्या बाहेर तीन साखर कारखाने घेऊन ते यशस्वीरीत्या सुरू ठेवण्याचे काम पंढरपुरातील युवा उद्योजक अभिजित पाटील हे करत आहेत. उस्मानाबाद येथील धाराशिव साखर कारखान्यामध्ये पंढरपुरातून ऊस नेण्याची किमया त्यांनी करून दाखवली आहे. सध्या विठ्ठल कारखान्याला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच काही महिन्यात विठ्ठल कारखान्याची निवडणूक लागणार आहे. याबाबत त्यांनी शरद पवारांशी झालेल्या भेटीदरम्यान चर्चादेखील केली आहे. त्यामुळे अभिजित पाटील यांना शरद पवारांचा आशीर्वाद लाभेल का, याकडे विठ्ठल कारखान्याचे सभासद, नेते व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
----
फोटो :
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करताना धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील.