रेवणसिद्ध मेंडगुदले
मंद्रुप : मुख्यपिकाबरोबर घेतलेल्या आंतरपिकानेच लाखाचे उत्पन्न देण्याची किमया औज (मं़) येथील एका शेतकºयाने साधली आहे़ मुख्यत्वे जीवामृताचा डोस दिल्याने पिकाची वाढ महत्त्वाची ठरली़ प्रयोगशील शेतीतून आठ महिन्यात एक एकरात २़५० लाख रुपयांचे उत्पन्न शेवगा पिकाने दिले आहे.
रमेश शिवशरण नारोणा असे त्या शेतकºयाचे नाव आहे़ तीन वर्षांपूर्वी त्यांनी दोन एकरात चंदनाची लागवड केली़ या मुख्य पिकाबरोबर घेतलेल्या शेवगा या आंतरपिकानेच आठ महिन्यात भरघोस उत्पन्न मिळवून दिले आहे़ विशेषत: रासायनिक पिकाचा वापर अजिबात करण्यात आला नाही़ सेंद्रिय खताचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रथमत: नारोणा यांनी दोन एकरात चंदनाची ५०० झाडं लावली़ चंदनाच्या झाडाची वाढ ही १५ वर्षांनी होते. या पिकामध्ये शेवगा, लिंबू, डाळिंब, पेरू ही आंतरपिके घेतली़ आंतरपिकात शेवग्याला जास्त लक्ष केंद्रित केले़ २ सप्टेंबर २०१९ रोजी एक एकरात ओडिसा वाणाची शेवग्याची २७५ रोपं लावली़ या दोन रोपांमध्ये आठ फुटाचे अंतर ठेवले़ याच्या लागवडीसाठी सहा हजारांचा खर्च आला़ विशेषत: हे पीक घेताना जमिनीची मशागत केली़ उत्तम पीक वाढीसाठी दोन गीर गाई आणल्या आणि त्याचे शेणखत आणि गोमूत्र यांचा डोस शेवग्याला दिला. आजपर्यंत यासाठी रासायनिक खत अजिबात वापरले नाही़ आठ-आठ दिवसांनी २०० लिटरच्या ड्रममधून जीवामृत दिले़ यामुळे शेवग्याला एक प्रकारचे तुप मिळाले आणि फलधारणा चांगली झाली़
टणक नव्हे़़़मऊ शेवगा - ओडिसा वाणाच्या शेवग्याचे विशेषत्व असे की काढणीपर्यंत हा शेवगा मऊ राहतो़ तो टणक होत नाही़ त्यामुळे बाजारातही सहज विकला जातो़ लांब लचक आणि गर हा मऊ राहतो़ चविष्ट शेवग्याला बाजारात मोठी मागणी आहे़ सरासरी अंदाज घातला तर एका झाडाकडून १५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे़
शेवग्यासाठी कुठेही बाजारपेठेत फिरावे लागले नाही़ स्थानिक पातळीवरच्या बाजार पेठेतच शेवगा गेला़ एका शेवग्याला जास्तीतजास्त पाच रुपयांचा दर मिळाला़ कमी खर्चात, कमी मशागतीत आणि जास्त उत्पन्न देणारे हे पीक आहे़ प्रयोगशील शेतीतून कमी जागेत भरपूर उत्पन्न घेऊ शकतो़ - रमेश नारोणाशेवगा उत्पादक, औज (मं)