सोलापूर : आषाढी एकादशीच्या सोहळ्यात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या. आषाढी वारीपूर्वी आणि आषाढी वारी सोहळ्यानंतर श्रमदानाने पंढरपूरची स्वच्छता केली जाणार असून यामध्ये जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज केले.
आषाढी एकादशी सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, आळंदी देवस्थानचे प्रमुख कार्यवाह अजित कुलकर्णी, अभय टिळक, उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे, शमा ढोक-पवार, सचिन ढोले, प्रवीण साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर, कार्यकारी अभियंता विलास मोरे, तहसीलदार मधुसूदन बर्गे, रमा जोशी, बाई माने महावितरणचे कार्यकारी अभियंता मधुकर पडळकर आदी उपस्थित होते.
पंढरपुरात २३ जुलै रोजी आषाढी वारी सोहळा होणार आहे. या सोहळ्यात स्वच्छता, सुरक्षितता, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्था या बाबींवर प्राधान्याने लक्ष दिले जावे. वारी सोहळ्यातील आवश्यक असणारी अतिक्रमणे काढावी, पालखीच्या मुक्कामाची आणि विसाव्याच्या ठिकाणी मुरमीकरण करून घ्यावे, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या.
तीर्थक्षेत्र आराखड्यातून २२७ कोटींचा खर्च- बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून पंढरपूरसाठी ४६७ कोटी रुपये मंजूर झाले. यापैकी २४९ कोटींचा निधी प्राप्त झाला असून २२७ कोटी रुपये आजवर खर्च झाले आहेत. यातून पंढरपूर शहरात ८५ कामे करण्यात येत आहेत. यातील ४३ कामे पूर्ण आहेत. २३ कामे प्रगतिपथावर आहेत. १२ ठिकाणी भूसंपादनाच्या अडचणींमुळे कामे होण्यास वेळ लागत आहे. ७ कामे वगळण्यात आली आहेत. पालखी मार्गावरही ३१ कामे झाली आहेत.
पाण्याची व्यवस्था असावी- जिल्हा परिषदेने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, पालखी तळाच्या परिसरातील विहिरींचे पाणी पिण्यायोग्य आहे का, याची आरोग्य विभागामार्फत तपासणी करावी, पाण्याचे स्रोत निश्चित करुन ठेवून पालखी तळ आणि स्रोत यांचे नकाशे तयार करुन घ्यावे. टँकरच्या पुरवठादार आणि चालकाचे मोबाईल क्रमांक पालखी प्रमुखांना उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हा परिषदेला दिल्या.