आप्पासाहेब पाटील, सोलापूर: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात होणारी शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सहपरिवार आज सायंकाळी पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्यांच्या पंढरपुरातील कार्यक्रमावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, कामगार मंत्री सुरेश ख्याडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अन्य मंत्री, आमदार, खासदार व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, बुधवार २८ जून २०२३ रोजी दुपारी ३ वाजता त्यांचे सोलापूर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते सोलापुरातून पंढरपूरकडे हेलिकॉफ्टरने जाणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजता पर्यावरणाची वारी..पंढरीच्या दारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर वनविभागाच्या कॉफी टेबल बुक पुस्तक प्रकाशन, आषाढी यात्रा स्वच्छता दिंडी समारोप अशा विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. मध्यरात्री २.१० वाजता पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेसाठी ते सहपरिवार उपस्थित राहतील.
गुरूवार २९ जून २०२३ रोजी पहाटे चार वाजता ते शासकीय विश्रामगृहात थांबतील. त्यानंतर सकाळी १० वाजता अनुकंपा तत्वावरील नियुक्ती पत्र वाटप, अन्नदान कार्यक्रम, महाआरोग्य शिबीर, कृषि प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. त्यानंतर ते दुपारी १ वाजता पंढरपुरातून सोलापुरात येतील. सोलापुरातून विमानाने मुंबईकडे जाणार आहेत.