सोलापूर दि २३ : महाराष्ट्र राज्यातील रस्त्यांवरील संपूर्ण खड्डे बुजविण्यासाठी व महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, अधिकारी व कर्मचा-यांचा संपूर्ण महाराष्ट्र दौरा सुरू आहे़ १५ डिसेंबरअखेर महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्यात येईल़ शिवाय १५ वर्षे टिकतील असे मजबुत व पारदर्शक रस्ते तयार करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम तथा महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी सोलापूरात दिली़
सोलापूरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बांधकाम विभागातील सभागृहात आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली़ उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौºयावर ते सोलापूरात आले होते़ यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे पदाधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी व महसुल विभागातील सर्वच अधिकारी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील खड्डयांचा विरोधकांकडून नुसताच बाऊ करण्यात येत आहे़ पावसाळ्यात खड्डे पडतात नंतर ते बुजविले जातात हे बांधकाम विभागाचे रूटीन काम आहे. त्याचा एवढा मोठा बाऊ करणे योग्य नाही़ भविष्यातील कामाविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गासाठीचा भारत माला प्रकल्पासाठी केंद्राकडून ६ हजार कोटी रूपये जास्तीच्या प्रमाणात आणले.
येत्या दोन वर्षात राष्ट्रीय महामार्गाचे २२ हजार किलोमीटर रस्ते करणार आहे़ ९६ हजार किलोमीटरपैकी ३८ किलोमीटर रस्ते चार पदरी, सहा पदरी करण्यात येणार आहेत़ बनविलेले रस्ते हे १५ वर्षे टिकतील अशीच तयार करण्यात येणार आहेत़ यावर बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांचे लक्ष असणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले़