विलास जळकोटकर, सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रे नगर कुंभारी येथील १५ हजार घरकुलांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त दौऱ्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी काँग्रेससह विविध पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. दौरा आटोपल्यानतर त्यांना सोडण्यात आले. दरम्यान प्रकाराचा राजकीय मंडळींनी निषेध व्यक्त केला.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यात केंद्राचा व राज्य शासनाचा संपूर्ण ताफा शहरात होता. पोलिस महासंचालकांसह केंद्राचा व राज्याचा पोलिस प्रशासनाचाही बंदोबस्त ठेऊन प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होता.
पोलिस प्रशासनानेही प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजकीय तसेच अन्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांवर नजर ठेवून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या निवासस्थासमोर बंदोबस्त ठेवला होता. तर विजापूर नाका पोलिस ठाण्यात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते रवी मोहिते, सकलेश बाभूळगावकर, प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवले होते. दरम्यान पोलिसांच्या या कृत्याबद्दल वरील मंडळींनी निषेध व्यक्त केला.