सोलापूर: पावणं म्हशी केवड्याला आणलाव..कुठून आणल्यात.., असे एकामागून एक प्रश्न अमरने विचारले. अन् त्या दोघांना काय बोलावे ते सूचेना. गडबडीत १० हजार रुपयांत आणल्याचे सांगितल्याने अमरला संशय आला. अमर आपल्या जनावरांजवळ आला तर काय त्याचीच गाय पोबारा केली होती. तोपर्यंत ते दोघे पसार झाले होते.
परवा मनगोळीच्या तीन व डोणगावची एक अशा चार म्हशी चोरट्यांनीचोरून टेम्पोतून पाथरी- बेलाटी रोडवरील लिंगाप्पा मळगे यांच्या वस्तीजवळच्या झाडीपर्यंत आणल्या. टेम्पो बिघाडल्याने म्हशी तेथील झाडीला बांधू लागले. तेथून जाणाऱ्या ऊस तोडणी गाड्यावाल्यांना संशय आल्याने त्यांनी लिंगाप्पा यांचा मुलगा अमरला सांगितले. अमर लागलीच तेथे आला व म्हशी केवढ्याला आणलाव?, व इतर प्रश्न विचारू लागला. म्हशी चोरट्यांना काय बोलावे ते सूचेना. त्यांनी १० हजाराला आणल्यात असे सांगितले. १० हजारात चार म्हशी कशा मिळतील?, यामुळे अमरचा संशय बळावला. तिकडे अमरच्या गोठ्यातील गाय चोरून पसार केली होती. ही बाब अमरच्या लक्षात येईपर्यंत ते दोघे चोरटे दुचाकी व टेम्पोसह पसार झाले होते. दुसऱ्या वाहनातून म्हशी हलवायच्या बेतात असतानाच अमरने इतर लोकांना बोलावले. त्यामुळेच ते चोरटे म्हशी झाडाला बांधून पसार झाले.
------
म्हशी मालकाच्या स्वाधीन
- तेथे अमरसह इतरही लोक जमा झाले. कोणी पोलिसांना तर कोणी तेलगाव, मनगोळीला फोन केले. पोलीस व म्हशीचे मालकही आले. पोलिसांनी पंचनामा करून म्हशी त्या मालकाच्या ताब्यात दिल्या.
- * समाधान भोई व राजकुमार बंडगर या दोघे चोरट्यांना सोलापूर तालुका पोलिसांनी पकडले व अटकही केली.
- * अमर लिंगाप्पा मळगे यांची गाय हाती लागली नाही.
मनगोळीच्या तीन व डोणगावची एक चोरलेली म्हैस चोरट्यांनी झाडीत बांधली होती. त्या म्हशी माझ्या वस्तीवर घेऊन गेलो. संबंधित शेतकऱ्यांना म्हशी दिल्या; पण माझी ८५ हजार रुपयांची गाय अद्याप मिळाली नाही. पोलिसांनी गाय परत मिळवून देतो, असे सांगितले आहे.
- अमर मळगे, शेतकरी, पाथरी
जनावरे खरेदी करणारे दोघे व टेम्पो पकडला आहे. जनावरे चोरी प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. तालुक्यातील इतर गावातील जनावरांच्या संपूर्ण चोऱ्या शोधत आहेत.
- अरुण फुगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक