सोलापूर : कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून येत्या २७ डिसेंबर २०२० ला 'लोकमंगल'चा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणार आहे. लोकमंगल फाउंडेशनतर्फे होणाऱ्या या सोहळ्याची यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती फाउंडेशन चे प्रमुख शहाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधू-वरास विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे, भोजनाची सोय, मामा करता मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणिमंगळसूत्र, जोडवे देण्यात येणार आहेत, त्याशिवाय संसारोपयोगी साहित्यही देण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
यंदाही या सोहळ्यात जास्तीत जास्त जोडप्यांचा विवाह लावण्याचा संकल्प करण्यात आला असून यासाठी १२५ माहिती केंद्रे सर्व जिल्ह्यात उभा करण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षी शाहीभोजन, मिरवणूक होणार नाही, मोजक्याच लोकांच्या उपस्थित हा सोहळा होणार आहे. जास्त नोंदणी झाल्यास दिवसभरात चार ते पाच टप्प्यात अक्षता सोहळा करण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही पवार यांनी सांगितले.