सोलापूर : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत जोखमी घेऊन एचआयव्ही बाधितांसाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या दोन कन्यांचे कौतुक केले आहे. सोलापुरात राहणाऱ्या आरोग्यसेविका अर्चना पकाले यांचे तसेच मूळच्या मोहोळच्या रहिवासी असलेल्या आरोग्य सेविका मेघा दुगम यांना पंतप्रधान मोदींनी पत्र पाठवून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
अर्चना पकाले या सोलापूरच्या राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमात मागील आठ वर्षांपासून आरोग्य सेविका म्हणून काम करतायत. जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित लोकांना, अतिजोखीम गटातील नागरिकांना, देहविक्रय करणाऱ्या महिलांना व तृतीयपंथी लोकांना एआरटी आणि एचआयव्ही प्रतिबंध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ८ हजार ६७५ नागरिकांचे कोरोना लसीकरण केल्याने आरोग्यसेविका अर्चना पकाले यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवून कौतुक केले. यानिमित्त जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी पकाले यांचा सत्कार केला आहे.
दुगम यांची पुनवळे आरोग्य केंद्रात सेवा
पिंपरी-चिंचवडच्या पुनवळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका असलेल्या मेघा दुगम यांचाही पंतप्रधान मोदींकडून कौतुक झाला आहे. दुगम या मूळच्या मोहोळच्या रहिवासी आहेत. मागील सात वर्षांपासून त्या आरोग्य सेविका म्हणून काम पाहतायत. त्यांनी कोरोनाकाळात हजारो नागरिकांचे लसीकरण केले असून, त्यांच्या कामाची दखल पंतप्रधान मोदींकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचेही सोलापुरात अभिनंदन होत आहे.