सोलापूर : सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील सांगवी गावानजीक गोडेतेलाच्या टँकरचा बुधवार २४ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास अपघात झाला. अपघातानंतर टँकर पलटी झाला अन् गोडेतेल रस्त्यावर वाहू लागलं. अपघातग्रस्त ठिकाणापासून जवळच्या गावात ही गोष्ट वान्यासारखी पसरली. मग काय, नागरिकांनी रस्त्याकडे धाव घेतली. गोडेतेल पळवण्यासाठी घागर, कळशी, डबे घेऊन लोकांनी धाव घेतली. अपघातग्रस्त ठिकाणी तेल घेऊन जाण्यासाठी अक्षरशः रांगा लावल्या होत्या. महागाईच्या झळीने होरपळलेल्या नागरिकांनी घागर, कळशी अन् मिळेल त्या भांड्यामध्ये गोडेतेल लंपास केलं. गोडेतेल घेऊन जाण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती.
टँकरचा टायर फुटल्याने टँकर विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाला अन् ही दुर्घटना घडली. टँकर पलटी होताच टँकरमधून गोडे तेलाच्या धारा लागल्या. गोडेतेल घेऊन जाण्यासाठी घागरी, डबे आणि मिळेल ते साहित्य घेऊन लोकांनी अक्षरशः रांगा लावल्या होत्या. मात्र पोलीस प्रशासनाने येऊन लोकांना पांगावले. महागाईच्या जमान्यात लोकांनी भरभरून तेल नेहले. मिळालेल्या माहितीनुसार, राजकोटवरून हा टँकर बंगळुरुच्या दिशेने चालला होता. त्याचवेळी टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती ग्रामस्थांनी दिली.