रेवणसिद्ध जवळेकर सोलापूर : रोजच काम करायचं अन् आलेल्या मजुरीतून घर चालवायचं... रोज कमावल्याशिवाय चूलही पेटत नाही... अशा लोकांसाठी नवीन वस्त्र कुठून येणार?.. इतरांनी वापरलेले कपडेच त्यांच्या नशिबी; पण हे कपडेही नवीन होतात अन् बाजारात विकत मिळतात. हो, आपल्या मंगळवार बाजारातच. उच्चभ्रूंनी वापरून टाकून दिलेले शर्ट, पॅन्टस् अन् साड्या भट्टी करून त्यांना कडक इस्त्री केली जाते अन् ते विक्रीसाठी सज्ज होतात. जुन्या कपड्यांच्या तेजीत चालणाºया या व्यवसायातून विक्रेत्याची गुजराण तर होतेच, शिवाय गोरगरिबांना नवीन कपड्यांची अनुभूतीही मिळते.
जोडभावी पेठेतील मंगळवारी भरणारा आठवडा बाजार हा ब्रिटिशकालापासून सुरु आहे. शंभरहून अधिक वर्षांची या बाजाराला परंपरा आहे. बाजारातील मटण मार्केटलगत असलेल्या मोकळ्या मैदानातील जुन्या कापडांच्या बाजारात आॅन दि स्पॉट रिपोर्टिंग करताना कष्टकरी, कामगारांसाठी हा बाजार म्हणजे सेल्स अॅन्ड एक्झिबेशन असल्याचे चित्र ‘लोकमत’ चमूच्या कॅमेºयात बंदिस्त झाले. विशेषत: या बाजारात पुरुषांपेक्षा महिला विक्रेत्यांची संख्याही लक्षणीय दिसून आली.
दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी ‘लोकमत’चमू जुन्या अडत बाजाराच्या दिशेने मंगळवार बाजारात दाखल झाला. जुन्या चपला, लोखंड बाजार पार करुन जुन्या कापडांच्या बाजारात प्रवेश झाला.
या बाजारात साध्या पॅन्टसह जीन पॅन्ट अन् शर्ट विक्रीचे अनेक स्टॉल्स दिसले. कुणी डोक्यावर विक्रीतीलच कपडे डोक्यावर घेऊन उन्हापासून बचाव करीत होते. बाजार फिरता-फिरता गेल्या २५-३० वर्षांपासून व्यवसाय करणाºया संगिता मोहन वाडेकर यांनी आमच्या दिशेने हात करीत ‘अहो साहेब, महापालिकेचे अधिकारी का ?. आम्ही बायका उन्हातच बसतो. ना सावली ना पाणी. काहीतरी करा’ अशी विनंती केली. जेव्हा त्या महिला विक्रेत्यास आम्ही येण्याचे कारण सांगितल्यावर त्यांनी जुन्या कापडांच्या बाजाराचा इतिहासच मांडला. जुने कपडे विकत घेतल्यापासून ते त्यावर धुलाई, इस्त्री करण्यापासून ते घडी घालण्यापर्यंतचा प्रवासही सांगितला. आठवड्यातून एक दिवस या बाजारात येतो आणि १० ते १५ पॅन्ट, शर्ट जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
दुपारचा पाऊण वाजला होता. सागर करपेकर याने उत्कृष्टपणे मांडलेल्या स्टॉलसमोर चमू पोहोचला. दिवाळीत जसे विविध कंपन्यांचे स्टॉल्स लागतात, तसा काहीसा प्र्रकार करपेकर यांचे स्टॉल्स नजरेत भरल्यावर दिसून आला. सागर सांगत होते, ‘साहेब, या व्यवसायातील माझी चौथी पिढी. पुण्यातील बहुतांश लोक जुने कपडे भांडीवाल्याला देऊन टाकतात. त्यातील काही चांगले शर्ट, पॅन्ट, साड्या आणि अन्य कपडे मी विकत घेतो.
घेतलेल्या कपड्यांचे बटण, काझे पाहतो. नसेल तर बटण, पुनर्काझे करुन ते कपडे भट्टीला देतो. इस्त्री करुन तयार झालेले पॅन्ट, शर्ट घडी घातल्यावर त्याचे पॅकिंग करतो. आठवडाभर संसाराचा गाडा हाकण्यासाठी जे पैसे हवे असतात, तेवढे पैसे मिळून जातात.
रेडिमेड कपड्यांचे जणू मिनी शोरुमच...- घरोघरी जुने कपडे घ्यायचे अन् त्या मोबदल्यात त्यांना भांडी देण्याचा हा एक विशिष्ट समाजातील महिलांचा व्यवसाय. तेच-तेच कपडे वापरण्याचा कंटाळा आला तर ते टाकून दिले जातात. गृहिणीही तोच कित्ता गिरवतात. मग भांडी देऊन जुने कपडे विकत घेण्याचा अन् घेतलेल्या कपड्यांची विक्री करण्याच्या व्यवसायाने जन्म घेतला. जर्मनच्या टोपल्या, पातेले, तवल्या, स्टीलचा डबा, तांब्या, किटल्या, प्लास्टिकचे डबे, टोपल्या आदी भांडी देऊन टाकून दिलेले कपडे घेतले जातात. हेच कपडे एका समाजाच्या महिलांना विकले जातात. मंगळवारच्या या बाजारात ५० हून साड्या तर १०० हून अधिक शर्ट, पॅन्ट जात असल्याचे माधवी रतन पालकर यांनी सांगितले. गॅरेजसाठी चिंध्या उपयुक्त...- दुचाकी, चारचाकी रिपेअर करणाºया कुशल कामगारांना वाया गेलेले कपडे म्हणजे चिंध्या लागत असतात. अशा चिंद्या ५ रुपये किलो दरानेही मिळत असल्याचे चित्र सुशिला पाचंगे, रंजना वाघमारे, कमाबाई पाचंगे यांच्याकडे पाहावयास मिळाले.
आम्ही बायका अनेक वर्षांपासून जुने कपडे विकत असतो. महापालिकेचे जे काही दर आहेत, ते दरही अदा करीत असतो. असे असतानाही इथे सुविधा मिळत नाहीत. बाजारात स्वच्छता होत नाही. पिण्याच्या पाण्याची सोयही नाही.- संगीता मोहन वाडेकरविक्रेत्या- मंगळवार बाजार