याबाबत समाधान सीताराम मगर, रा. वासूद यांनी खबर दिली असून पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. दरम्यान, शरीफ पठाण यांच्या घराला आग लावली की लागली, याची घटनास्थळी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.
मृत शरीफा पठाण ही वृद्ध महिला गेल्या अनेक वर्षांंपासून मिरज हायवेवरील सूतगिरणीसमाेर पत्र्याच्या खोलीत एकटीच राहत होती. तिच्या खोलीमध्ये विजेची सोय नसल्याने रात्री उजेडासाठी कंदिलाचा वापर तर चुलीवर स्वयंपाक करीत होत्या. दरम्यान, बुधवारी मध्यरात्रीनंतर शरीफा पठाण यांच्या घराला अचानक आग लागली. या घटनेची माहिती अरविंद केदार यांनी फोनवरून जवळच राहणारे समाधान मगर यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता अग्निशामक दलाचे फायरमन आशिफ काझी, संतोष सरगर, पोलीस कर्मचारी इतर लोकांनी अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणली. त्यानंतर सीताराम मगर व पोलीस कर्मचाऱ्यांनी आत जाऊन पाहिले असता शरीफा पठाण या पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत पडल्या होत्या. पोलिसांनी या घटनेची माहिती त्यांची मंगळवेढा येथील मुलगी शाहीरा आलम शेख यांना कळवली. तिने घटनास्थळी येऊन ही आग घरातील रॉकेलच्या कंदिलाने किंवा चुलीतील विस्तवाने लागल्याचे सांगून कोणावर संशय अगर तक्रार नसल्याचे जबाबात सांगितले आहे. दरम्यान, शरीफा पठाण यांचा मृत्यू झाल्याने थांबलेल्या सर्व्हिस रोडचा अडथळा आपोआप दूर झाला आहे.
मृत्यूबाबत तर्कवितर्क
सोलापूर-सांगली राष्ट्रीय महामार्गाच्या रस्तेबांधणीचे काम सुरू आहे. सांगोला सूतगिरणीसमोर पूर्वेकडील सर्व्हिस रोडच्या मध्यभागी मृत शरीफा पठाण यांचे घर रोडला अडथळा ठरत होते. तिने जागेचा तीन लाख रुपये मोबदला मिळाल्याशिवाय ते काढू देणार नाही, असे संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याला बजावले होते. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्याने कधीही फोन करा. २० हजार रुपये घेऊन जावा, असे सांगितले होते. त्यानंतर बुधवारी मध्यरात्रीनंतर तिच्या घराला आग लागून तिचा जळून मृत्यू झाल्याने अनेक तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.
फोटो
०४सांगोला
ओळी
सांगोला सूतगिरणीसमोरील याच घराला आग लागून शरीफा पठाण यांचा जळून मृत्यू झाला.