पंढरपूर : पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या तुफान पावसामुळे नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी, नदीकाठच्या गावांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या दहा वर्षात चंद्रभागा नदीवरील जुना दगडी पूल तब्बल नऊ वेळा पाण्याखाली गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
२००९ साली पंढरपूर येथे महापूर आला होता. यावेळी मंदिर परिसरातील, व्यासनारायण झोपडपट्टी, आंबेडकर नगर, गुरुदत्त नगर आदी परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. यामुळे प्रशासनाने वरील भागातील नागरिकांची राहण्याची सोय रेल्वे स्टेशन परिसरात व अन्य शाळांमध्ये केली होती. यामागील दहा वर्षाच्या कालावधीत शहरातील नवा पूल (अहिल्या पूल) एक वेळा, जुना दगडी पूल ९ वेळा, गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील जुना पूल ७ वेळा तर नवा पूल १ वेळा पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर भीमा नदीपात्रातील पाण्याने ४ वेळा इशारा पातळी तर २ वेळा धोका पातळी ओलांडली असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बरगे यांनी दिली आहे.
यंदाच्या वर्षी देखील पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे वजामध्ये असलेल्या उजनी धरणाचा उपयुक्त साठा ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मंगळवारी भीमा नदीच्या पात्रात १ लाख ६० हजारांच्या आसपास विसर्ग होता. यामुळे गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी आले होते. पुन्हा मंगळवारी उजनी धरणातून भीमा नदीपात्रात १ लाख ५० हजार क्युसेक तर वीर धरणातून ६२ हजार १७३ क्युसेक असा एकूण २ लाख १२ हजार १७३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. हेही पाणी पंढरीत पोहोचल्यानंतर पुन्हा महापूर येणार आहे.