जुन्याचं सोनं करणारा सोलापूरचा कारागीरआॅनलाईन लोकमतसंताजी शिंदे - सोलापूर एकेकाळी प्रतिष्ठेची समजली जाणारी सायकल आज मोटरसायकलच्या जमान्यात अडगळीत पडली आहे. याच सायकलीला आपल्या संकल्पनेतून वेगळी दिशा देऊन जुन्याचं सोनं करणारा कारागीर गुरुनानक चौकात सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. आकर्षक सायकली तयार करून लोकांना दररोज व्यायामासाठी प्रवृत्त करीत आहे. फारूक मकबुलसाब सय्यद हे इयत्ता ७ वीपर्यंत शिकलेला कारागीर हा कुर्बान हुसेन नगर येथील रहिवासी आहे. त्यांच्या वडिलांचं सायकल दुकान होते. त्यांच्याकडे त्यांच्या मामा लोकांनी सायकल रिपेअरीचे काम शिकले होते. या मामा लोकांकडून फारूक सय्यद यांनी सायकल रिपेअरीचे काम शिकून घेतले. गुरुनानक चौकात फारूक सायकल रिपेअरीच्या दुकानात ते नेहमीप्रमाणे पम्चर काढणे, सायकलच्या चाकाचे आऊट काढणे, हवा भरणे हे काम करीत होते. नेहमीच्या कामात बदल करावा आणि याच व्यवसायात वेगळे काहीतरी करावे असे त्यांना वाटत होते. २000 सालापर्यंत सायकल ही गरजेची वस्तू होती, नंतर मात्र स्वयंचलित मोटरसायकलच्या संख्येत वाढ झाली. हळूहळू सायकल वापरण्याचे प्रमाण कमी झाले. फारूक सय्यद यांच्या व्यवसायावरही तसा परिणाम होऊ लागला, पण त्यांनी हिंमत हरली नाही. आहे त्या व्यवसायात लोकांना काय पाहिजे याचा विचार करून त्यांनी जुन्या सायकलींना आपल्या कल्पनेनुसार आकार देण्यास सुरुवात केली. रिपेअरीला आलेली जुनी सायकल पूर्णपणे वेगळी करून मनाच्या संकल्पनेतून वेगळा लूक देण्यास सुरूवात केली. हा लूक लोकांना आवडू लागला. एका सायकलीस होंडाचे सॉकआॅब्सर बसवून आकर्षक व आरामदायी बनविले. हा मॉडेल लोकांना खूप भावला. हळूहळू लोक जुन्या सायकली फारूक सय्यद यांच्याकडे रिपेअरीसाठी देऊन आकर्षक मॉडेल करून घेत आहेत. या सायकलींचा वापर लोक सकाळी व्यायाम करण्यासाठी तर तरुण-तरुणी शाळा, कॉलेज आणि काहीजण कामासाठी करीत आहेत. कोणत्याही कंपनीला जमणार नाही अशी टेक्निक वापरून जुन्या सायकलीचे सोने करीत आहे. सध्या फारूकची कला सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.---------------------------१५ आॅगस्ट रोजी मोफत हवा- दरवर्षी १५ आॅगस्ट या स्वातंत्र्य दिनादिवशी देशभक्ती म्हणून फारूक सय्यद हे मोफत हवा भरत असतात. दिवसभरात कितीही लोक हवा भरण्यासाठी आले तरी त्यांना मोफत सेवा दिली जाते. शिवाय दुकानासमोर प्रजासत्ताक दिनही साजरा केला जातो. - सध्या त्यांनी आयुष्यात कधीही सायकल न चालवलेल्या दिव्यांग व्यक्तीसाठी स्वत:च्या संकल्पनेतून आरामदायी तीनचाकी सायकल तयार केली आहे. ही सायकल सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. - सायकल बनवीत असताना वेल्डिंग सोडले तर पेंटिंग, स्टिकरपासून सर्व कामे स्वत: फारूक सय्यद करीत असतात. नामांकित कंपनीला लाजवेल, अशी सायकल सध्या ते तयार करून देत आहेत. -------------------------दोन चेनची सायकल...४वृद्धांना उतारवयात सायकल चालवणे तसे कष्टाचे असते. चढावर सायकल चालवताना धाप लागतो, म्हणून फारूक सय्यद यांनी दोन चेनची सायकल तयार केली आहे. वास्तविक पाहता हा प्रयोग करीत असताना त्यांना लवकर शक्य झाले नाही. मात्र अनेक प्रयत्नांनंतर त्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. आज दोन चेनची सायकल वृद्धांना आणि व्यायाम करणाऱ्या लोकांसाठी सोयीची ठरत आहे.-----------------------------सायकलिंग आरोग्यासाठी फायदेशीर...सायकल ही आरोग्यासाठी फायदेशीर साधन आहे. सायकलिंगने माणसाचे आरोग्य सशक्त राहते, लठ्ठपणा कमी करण्यासाठी, बी.पी.च्या पेशंटसाठी आणि सुदृढ हृदयासाठी सायकलिंग ही खूप फायदेशीर ठरते. प्रत्येकाने दररोज एक तास सायकलिंग केल्यास आरोग्य निरोगी राहते व धकाधकीच्या जीवनात माणूस तंदुरुस्त राहतो. लोकांनी सायकल चालवली पाहिजे, असे आवाहन फारूक सय्यद यांनी लोकमतशी बोलताना केले.
जुन्याचं सोनं करणारा सोलापूरचा कारागीर
By admin | Published: March 21, 2017 4:20 PM