सोलापूर : गाडी फास्ट चालवा... गाडी फास्ट चालवा असं म्हटल्याने एसटी बसच्या चालकाने यवतजवळ एसटी बस रस्त्याच्याकडेला थांबवून तो अचानक पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, एमएच 09 ईएम 9726 ही एसटी बस शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बोरीवली येथून धाराशिवकडे जाण्यासाठी निघाली. ही गाडी बोरवली-पुणे -इंदापूर - बार्शी मार्गे धाराशिवकडे निघाली होती. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही गाडी यवत (पुणे ) येथे पोहचली. मात्र गाडीतील प्रवासी गाडी फास्ट चालवा फास्ट चालवा म्हटल्याने चालकाने रागाच्या भरात रस्त्याच्या कडेला गाडी लावून निघून गेल्याची घटना घडली. त्यानंतर बराच वेळ प्रवासी ताटकळत बसले होते. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अहमद शेख या व्यक्तीने शेअर केला आहे.
त्यानंतर फेसबुक लाईव्ह करणाऱ्या तरुणांने वाहकास आमचे पैसे परत द्या आम्ही दुसऱ्या गाडीने जातो असे म्हटले मात्र वाहकाने डेपो मॅनेजर यांनी सांगितल्याशिवाय मी पैसे देऊ शकत नाही त्यामुळे बराच काळ गोंधळ निर्माण झाला होता. साधारणपणे अर्धा तास प्रवाशी बसमध्येच बसून होते. अर्ध्या तासानंतर चालक आला अन् गाडी पुढे बार्शीकडे मार्गस्थ झाली. प्रवाशांनी चालकाला विचारताच तुमच्यामुळेच मी पोलीस स्टेशनला गेलो होतो असे सांगितले.