सोलापूर : शहरात शासकीय कार्यालयांसह इतर ठिकाणी जाण्यासाठी दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. त्यामुळे आपल्या शासकीय ओळखपत्र, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससारखे आता लसीचे प्रमाणपत्र व युनिव्हर्सल पास ठेवावे लागत आहे. प्रत्येक ठिकाणी हे दाखविण्यापेक्षा अनेक जण गळ्यातच प्रमाणपत्र अडकवीत असल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनाने शासकीय कार्यालय, पेट्रोल पंप, थिएटर, नाट्य मंदिर, रिक्षा, प्रवासी वाहतूक, मोठे मॉल, बँक, मंगल कार्यालय, रेस्टॉरंट, वाइन शॉप, विडी कारखाने आदी ठिकाणी दोन लसीच्या प्रमाणपत्राशिवाय प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांना प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागत आहे. हे प्रमाणपत्र चुकून घरी राहिले तर पुन्हा जाऊन आणावे लागते. हे टाळण्यासाठी या प्रमाणपत्राचा वापर आयकार्डसारखा करण्यात येत आहे.
--------
प्रमाणपत्राचे रिडक्शन प्रिंट
लसीच्या प्रमाणपत्राचा आकार हा मोठा आहे. त्यामुळे ते सतत बाळगणे मुश्कील होत आहे. यामुळे काही नागरिकांनी लसीचे प्रमाणपत्र डाऊनलोड करून त्याचे रिडक्शन (कमी आकारात प्रिंट) करून प्रिंट काढत आहेत. हे छोट्या आकाराचे प्रमाणपत्र सहज बाळगता येते.
---------
युनिव्हर्सल पासवर फोटो असल्याचा फायदा
लसीच्या प्रमाणपत्रावर स्वत:चा फोटो नसल्याने सोबत एखादे ओळखपत्र असावे लागते. त्यामुळे त्या व्यक्तीचेच प्रमाणपत्र असल्याचे स्पष्ट होते. यापेक्षा युनिव्हर्सल पास असणे सोयीचे ठरते. कारण युनिव्हर्सल पासवर फोटो असतो. त्यासोबतच पहिला व दुसरा डोस घेतल्याची तारीखही असते. युनिव्हर्सल पास हा सर्व प्रकारचे प्रवास व इतर राज्यात चालतो.
प्रशासकीय कामासाठी शासकीय इमारतीत प्रवेश मिळविताना दोनपैकी एक प्रमाणपत्र सोबत असणे गरजेचे आहे. प्रत्येक ठिकाणी हे प्रमाणपत्र दाखविणे मुश्कील होत असल्याने हे प्रमाणपत्र ओळखपत्रासारखे गळ्यात अडकविण्यास नागरिक पसंती देत आहेत. प्रमाणपत्र प्रिंट काढून घेण्यासाठी, तसेच आयकार्डसारखे बनविण्यासाठी मागणी वाढत आहे.
- सादिक नदाफ, व्यावसायिक, ऑनलाइन सेवा
--------
प्रमाणपत्र काढण्याचे दर असे...
- लसीकरण प्रमाणपत्राची प्रिंट - १० ते २० रुपये
- लसीकरण प्रमाणपत्राचे लॅमिनेशन - ४० ते ५० रुपये
- युनिव्हर्सल पास साधे प्रिंट - २० ते ३०
- युनिव्हर्सल पास प्रिंट (प्लास्टिक कार्ड) - ८० ते १००
------------------------------