सोलापूर : सोलापूरच्या चारही दिशेने राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणल्याने जिल्ह्यात दररोज येणाऱ्या पर्यटकांची संख्या लाखाच्या घरात आहे. यात पंढरपूर, तुळजापूर, तसेच अक्कलकोट आदी तीर्थक्षेत्र आघाडीवर असून, या महामार्गावर रोज ३३ हजार वाहने धावताहेत. राष्ट्रीय राजमार्ग विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात रोज ७२ हजार वाहने जिल्ह्यातील सात टोल नाक्यांवर टोल भरतात. वर्षाकाठी एकूण २ कोटी ६५ लाख ५७ हजार २३५ वाहने टोल भरतात.
सोलापूर-पुणे हायवेवरून सोलापूर हद्दीत येणाऱ्या वाहनांची संख्या २३ हजार ४६४ आहे. मागील तीन वर्षांत या मार्गावर सात हजार वाहनांची संख्या वाढली आहे. तीन वर्षांपूर्वी सोलापूर-पुणे हायवेवरून १६ हजार ९०३ वाहने रोज धावत होती. सध्या २३ हजार ४६४ वाहने पळताहेत. सोलापूर-पुणे हायवेनंतर सर्वाधिक वाहने सोलापूर-येडशी म्हणजे तुळजापूर महामार्गावर धावताहेत. तामलवाडी टोल नाक्यावर रोज १६ हजार १३१ वाहने टोल भरतात.
त्यानंतर, अक्कलकोट महामार्गावर रोज दहा हजार ७१२ वाहने धावत आहेत. वळसंग टोलनाक्यावर रोज दहा हजार वाहने टोल भरतात. पंढरपूर, अक्कलकोट, तसेच तुळजापूर या तिन्ही तीर्थक्षेत्र महामार्गावर रोज ३३ हजार १५८ वाहने धावतात. वर्षाकाठी १ कोटी २१ लाख २ हजार ६७० वाहने धावतात.