सोलापूर : नेत्याचं कार्यकर्त्यांशी संवाद होतच असतात. मात्र, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर बनलेली असताना सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी एका कार्यकर्त्याशी साधलेला अस्सल सोलापुरी ग्रामीण ढंगातील ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.. ओके !’ हा संवाद गाण्याच्या रूपातून पुढे आला. टी-शर्टांवरही झळकला. शहाजीबापूंच्या पोटातला संवाद ओठावर अन् ओठातला सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. देश-जगभरातून लाखो लाईक्स संवादाच्या गाण्याला मिळत आहेत.
शिवसेनेत बंड केल्यावर एकनाथ शिंदे जेवढे प्रकाशझोतात आले, त्यापेक्षा अधिक शहाजीबापू आले ते त्यांच्या अस्सल सोलापुरी ग्रामीण ढंगातील संवादामुळे. बंडानंतर शिंदे यांच्या गटात गेेलेल्या काही मंत्री, आमदारांसह शहाजीबापू सध्या गुवाहाटीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असताना त्यांनी कार्यकर्त्याशी साधलेल्या संवादानंतर ‘बापू’ राज्यात चांगलेच ट्रेंडमध्ये आले आहेत. बापूंच्या या संवादातून रचलेल्या या गाण्यानं सोशल मीडियाने दुष्काळग्रस्त सांगोल्याला देश-विदेशात पोहोचवलं आहे.
मग, महाराष्ट्रात स्मशान आहे का ?
बंड केलेले शहाजीबापू गुवाहाटीतील हॉटेलमधून साधलेला संवाद अन् सोशल मीडियावर त्यातून रचण्यात आलेलं गाणं पाहून शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आपली तिखट प्रतिक्रिया नोंदवली. ‘गुवाहाटीत काय झाडी, काय डोंगार, काय हाटील हाय... मग महाराष्ट्रात स्मशानभूमी आहे काय ? असा सवाल करीत त्यांना फटकारले आहे. आम्हीही रेडिसन ब्लू हॉटेलला मेल करून कार्यक्रमासाठी ४० खोल्या मागितल्या. पण, अजून त्यांचं मेलला उत्तर आलं नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांनाही डिवचले. सध्या शंतनू पोळे यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून, कुलदीप जाधव यांनी रचलेले आणि सचिन जाधव यांनी गायिलेले गीतही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
इंदुरीकर महाराजांना नवीन विषय भेटला !
शंतनू पोळे या युवकाने शहाजीबापूंच्या संवादाचा धागा पकडून मजेशीर गीत गात ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.. ओके’ हा संवाद बापूंचा घेत त्यापुढे ‘घरात धिंगाणा घालून मी, मामाच्या गावाला जाऊ मी’ हे गीत गात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या गीताला २३ हजार २१२ जणांनी लाईक केले. त्यातील काहींनी आपली कमेंट नोंदवली. प्रवचनकार इंदुरीकर महाराजांना आता नवीन विषय मिळाल्याची कंमेट एकाने नोंदवली. ‘सहा वेळेच्या पराभवाची वसुली एका झटक्यात वसूल’ असे मत एकाने नोंदवली. ‘या घाणेरड्या राजकारणानं कंटाळा आला होता, या गाण्यानं कंटाळ घालवला,’ या वर्षीचे नंबर वन गाणं, डीजेवर वाजणार सगळीकडे’, ‘काय मुंबई, काय शिवसैनिक, काय पोकळ बांबू’ अशी अनोखी कंमेट एकाने टाकली.
पर्यटन खातं मिळतंय का ?
सांगोला मतदारसंघातून शहाजीबापू सहा वेळा स्व. गणपतराव देशमुख यांच्याकडून पराभूत झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते गणपतरावांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करीत केवळ ६७४ मतांनी शिवसेनेकडून बापू विजयी झाले. आता बंडानंतर ते एकनाथ शिंदेंच्या गटात गेले. हा गट गुवाहाटीत असताना बापूंचा कार्यकर्त्यांशी झालेला संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला. जर कुण्या एका पक्षाच्या मदतीने एकनाथ शिंदे गट सत्तेत आला तर बापूंच्या संवादातील झाडी, डोंगार अन् हाटील या शब्दांमुळे त्यांना पर्यटन खातं मिळेल, अशी चर्चाही सोशल मीडियावर होत असल्याचे दिसते.